शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी अमरावती विभागातील २९२ उमेदवार पात्र - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 3, 2026

शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी अमरावती विभागातील २९२ उमेदवार पात्र

 

 



कागदपत्रांची पडताळणी
प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार

 

       अमरावती,दि. ४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया गुरुवार ३ सप्टेंबर पासून सुरू झाली असून शनिवार ५ सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून राज्यातील १६०० पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली असून यात अमरावती विभागातील २९२ उमेदवारांचा समावेश आहे.

  

            शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रे पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांनी निर्धारित केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी विकास  आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे. 

 

शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या २४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीशिवाय निवड झालेल्या प्राथमिक शिक्षक- ९२७, माध्यमिक शिक्षक-४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक- २५२ अशा एकूण १६०० उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. त्यात पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील ११४१ उमेदवारांचा समावेश आहे. संबधित उमेदवारांच्या मुळ शैक्षणिक अर्हता कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. नाशिक विभागात सर्वाधिक पात्र ५८८ उमेदवार असून, त्याखालोखाल ठाणे विभागात ४२४ उमेदवार, नागपूर विभागात २९६उमेदवार तर अमरावती विभागात २९२ उमेदवार आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहीर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर अपर आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले.

 

संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार लागणारी कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (self-attested) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. निर्धारित केलेल्या दिनांक व वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

                                    संवर्गनिहाय पदसंख्या

 

पेसा क्षेत्रातील १९६ मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक , १६ इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, ९४ मराठी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक, २ इंग्रजी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक आणि १५१ उच्च माध्यमिक शिक्षक भरती करण्यात येणार आहे. तर नॉनपेसा क्षेत्रातील ५९३ मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, १२२ इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, ३०२ मराठी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक, २३ इंग्रजी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक  आणि  १०१ उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages