रवी नगर चौकात थरार; तरुणीवर आठ वार, उपचारादरम्यान मृत्यू
दि. ४ अमरावती : शहरातील गजबजलेल्या रवी नगर चौकात गुरुवारी दुपारी एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मृत तरुणीचे नाव शर्वरी गणेश हाडके (वय १७ वर्षे) असे असून ती अंबाविहार परिसरातील रहिवासी आणि रवी नगर येथील श्री. बृजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. अंबाविहार परिसरात राहणारी शर्वरी गुरुवारी दुपारी १२:३० ते १२:४५ च्या सुमारास दुचाकीवरून महाविद्यालयाकडे जात होती. त्यावेळी आरोपी तरुण तिचा दुचाकीवरून पाठलाग करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.
शर्वरी रवी नगर चौकात पोहोचल्यानंतर आरोपीने तिचा रस्ता अडवला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या मान, छाती आणि पोटाच्या भागावर माथेफिरू आरोपीने तब्बल ८ वेळा चाकूने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ उडाला.
हल्ल्यानंतर शर्वरी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळली. घटनेची माहिती मिळताच नागरिक आणि पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीचे नाव आनंद नंदकिशोर भड (वय २१ वर्षे, ) असून तो अकोला जिल्ह्यातील रा. रोही माना, मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे.
आरोपी आणि शर्वरी यांची पूर्वीपासून ओळख होती आणि आरोपीकडून तिचा काही काळ पाठलाग केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या हत्येमागे एकतर्फी प्रेमसंबंध आणि तरुणीने आरोपीशी बोलणे बंद केल्याचा राग कारणीभूत असल्याचे असू शकते.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला
राजापेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकांनी तातडीने चक्र फिरवत आरोपी आनंद भडला गोंदिया येथून अटक केली आहे.
वर्दळीच्या चौकात भरदिवसा तरुणीची हत्या झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अमरावतीतील वाढत्या हत्यांच्या घटनांबाबत चिंता
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, गेल्या आठ महिन्यांत शहरात ३२ हत्यांचे गुन्हे दाखल झाले असून मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा २६ होता. त्यामुळे वाढत्या हिंसक गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असल्याची चर्चा आहे.
या घटनेने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ती घरातील एकुलती एक मुलगी होती. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या हत्येने शहरातील महिला सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या घटनेवरून गृहविभाग आणि अमरावती पोलिसांच्या कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'दामिनी पथक' कुठे गायब झाले आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.