शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत ‘पॉलिटिक्स आणि मीडिया’ विषयावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
अमरावती, दि. ३ : राजकारण आणि माध्यमे यांचा समाजजीवनाशी असलेला संबंध समजून घेताना केवळ सैद्धांतिक माहिती पुरेशी नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माध्यम प्रक्रियेचा अनुभव मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीच्या राज्यशास्त्र विभागात ‘पॉलिटिक्स आणि मीडिया—राजकारण व माध्यमे’ या विषयावर अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे संचालक डॉ. केशव तुपे, IQAC समन्वयक डॉ. मंगेश शेळके आणि शैक्षणिक समन्वयक डॉ. दुर्गेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३० सप्टेंबर रोजी ही कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा भोरजार होत्या. प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे), अमरावती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यशाळेत राजकारण आणि माध्यमांचा परस्परसंबंध, लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका, राजकीय बातम्यांचे स्वरूप, माध्यमांमधून सामाजिक प्रश्नांना मिळणारे स्थान, सोशल मीडिया आणि राजकीय संवाद, माध्यम साक्षरता तसेच बातमीमागील सामाजिक वास्तव यावर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष ‘बातमी निर्मिती’चा सराव
या कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ व्याख्यान न देता प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून बातमी कशी तयार केली जाते, याचा अनुभव देण्यात आला. एखाद्या सामाजिक किंवा राजकीय विषयाची निवड करणे, त्यातील महत्त्वाची माहिती शोधणे, संबंधित व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेणे, तथ्य आणि मत यातील फरक समजून घेणे, बातमीचा मथळा व उपमथळा तयार करणे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे वृत्त तयार करणे, अशा टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सराव केला.
विद्यार्थ्यांना ‘एखादा सामाजिक प्रश्न माध्यमांपर्यंत कसा पोहोचतो?’ आणि ‘त्याच घटनेकडे राजकारण, समाज आणि माध्यमे वेगवेगळ्या पद्धतीने कशी पाहू शकतात?’ यावर चर्चा करून कृती देण्यात आली. त्यामुळे राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील संकल्पना आणि प्रत्यक्ष माध्यम व्यवहार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या काळात कोणतीही माहिती लगेच मोठ्या प्रमाणावर प्रसारित होते. त्यामुळे माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे, स्रोत समजून घेणे आणि जबाबदारीने माहिती प्रसारित करणे ही प्रत्येक नागरिकाची गरज असल्याचे कार्यशाळेत स्पष्ट करण्यात आले.
राजकारण समजून घेण्यासाठी माध्यमांकडे चिकित्सक नजरेने पाहणे आणि माध्यम समजून घेण्यासाठी समाजातील प्रत्यक्ष प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे, या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली.
पुढील काळातही प्रात्यक्षिक उपक्रम
राजकारण व माध्यमे हा विषय केवळ एका दिवसाच्या व्याख्यानापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माध्यम निर्मितीचा अनुभव देणारे विविध कृती व प्रात्यक्षिक उपक्रम पुढेही घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बातमी लेखन, मुलाखत घेणे, सामाजिक विषयांचे वृत्तांकन, माध्यमांतील राजकीय मजकुराचे विश्लेषण आणि डिजिटल माध्यमांमधील माहितीची पडताळणी अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर राहणार आहे.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रश्न विचारले तसेच प्रत्यक्ष कृतीमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील ‘राजकारण व माध्यमे’ हा विषय पुस्तकातील संकल्पनांपुरता न राहता सामाजिक वास्तव आणि प्रत्यक्ष माध्यम व्यवहाराशी जोडण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
यावेळी राज्यशास्त्र विभागातील प्रा.डॉ. के. एच. वासनिक,डॉ. सुनील इंगळे, डॉ. प्रमोद तालन, डॉ. सुमित वाघमारे, कु. अनामिका मेश्राम तसेच क्रांती मीडिया प्रतिनिधी सचिन वासनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. पवन तायडे यांनी केले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच प्रत्यक्ष माध्यम प्रक्रियेची ओळख करून देणारी आणि राजकारणाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी विकसित करणारी ही कार्यशाळा संवादात्मक व कृतीप्रधान ठरली.