अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : नागरिकांमध्ये माहितीच्या अधिकाराबाबत जनजागृती व्हावी आणि ही प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक व्हावी, यासाठी सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी 'माहिती अधिकार दिन' साजरा करण्याचे आवाहन राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठाने दिले आहेत.
माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती अधिकार कायद्याच्या (कलम २६) अनुषंगाने सर्वसामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये या कायद्याबाबत साक्षरता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांसोबतच शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांसाठी माहिती अधिकार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. कायद्याच्या कलम ४ नुसार प्रत्येक कार्यालयात जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी यांचे नाव व पदनाम दर्शवणारे फलक लावणे आणि ते वेळेवर अद्यावत ठेवणे बंधनकारक केले आहे.
तसेच नागरिकांना अर्ज करणे सोपे जावे म्हणून मार्गदर्शक सूचना कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात याव्यात, तसेच अर्जावर भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी नमूद करण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन राज्य माहिती आयुक्त कार्यालयाने केले आहे.
=