जळगाव जामोद (जिल्हा बुलढाणा):
क्रिप्टोकरन्सीमध्ये कमी गुंतवणुकीत अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सावरगाव येथील एका ६१ वर्षीय शेतकऱ्याची १० लाख ७१ हजार ४५३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ३ ऑगस्ट २०२६ रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकवरील जाहिरातीवरून संपर्क
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील
रहिवासी असलेले राजेशकुमार भिकमचंद केला (वय
६१) यांनी फेसबुकवर क्रिप्टोकरन्सी संदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. त्यांनी
त्या जाहिरातीमधील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर काही वेळातच एका परदेशी मोबाईल
क्रमांकावरून त्यांच्या व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या अज्ञात
व्यक्तीने स्वतःचे नाव 'सुनील कुमार' असल्याचे सांगितले. त्याने राजेशकुमार
यांना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, तसेच
काही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण भरपाई करून दिली जाईल, अशी खोटी हमी
दिली.
आश्वासनानंतरही कोणताही परतावा नाही
या आमिषाला बळी पडून फिर्यादी राजेशकुमार
केला यांनी २७ जानेवारी २०२६ पासून
वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खात्यातून
एकूण १०,७१,४५३.२० रुपये आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यांवर पाठवले. मात्र,
मोठ्या
प्रमाणात पैसे पाठवूनही त्यांना कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम परत मिळाली नाही.
सायबर पोर्टलवर तक्रार आणि गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ४ मार्च २०२६ रोजी
राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर (National Cyber Crime Reporting
Portal) आपली तक्रार नोंदवली. या प्रकरणाची प्राथमिक नोंद बुलढाणा येथील
सायबर पोलीस ठाण्यात झाली होती. मात्र, हे घटनास्थळ जळगाव जामोद पोलीस
ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, पुढील तपासासाठी हा गुन्हा जळगाव जामोद
पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
या कलमांन्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खालील कायदेशीर कलमांनुसार
गुन्हा दाखल केला आहे:
- माहिती
तंत्रज्ञान अधिनियम (IT Act), २०००: कलम
६६(सी) आणि ६६(डी)
- भारतीय
न्याय संहिता (BNS): कलम ३१८(२), ३१८(४)
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन बागुल करत आहेत