पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि.६ : जिल्ह्यातील तंत्रकुशल व व्यावसायिक कौशल्यधारक तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इंडिया स्किल्स स्पर्धेच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेद्वारे विविध तांत्रिक,व्यावसायिक,डिजिटल आणि मेकॅट्रॉनिक्स कौशल्यांमध्ये सहभाग घेता येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या उमेदवारांस आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आकर्षक पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि मार्गदर्शनही मिळणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतर झालेला असावा (काही विशेष तांत्रिक कौशल्यांच्या गटासाठी जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतर झालेला असावा.). शैक्षणिक पात्रतेत आयटीआय ,डिल्पोमा, पदवीचे विद्यार्थी किंवा कोणत्याही क्षेत्रातील तंत्रकुशल तरुण पात्र ठरतील. उमेदवार हा महाराष्ट्रातील मूळ रहिवासी किंवा महाराष्ट्रात शिक्षण अथवा नोकरी करणारा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
पात्र उमेदवारांना शासनाच्या www.skillindiadigital.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ७६२०५६०१२५ किंवा ७०२०९५८२३१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार असल्याचे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार च उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.