जलसंधारण जनजागृती अभियानात नागरिकांनी उत्सफुर्त सहभाग घ्यावा – जिल्हाधिकारी आशिष येरेकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 20, 2026

जलसंधारण जनजागृती अभियानात नागरिकांनी उत्सफुर्त सहभाग घ्यावा – जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 


21 ऑगस्ट रोजी साजरा होणार 'जलसंधारण दिन'

 

15 ऑगस्टपासून 'जलसंधारण सप्ताह'

 

अमरावती दि. २०( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  माजी मुख्यमंत्री  दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा होत आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय व मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताहाच्या औचित्याने जिल्ह्यात इंस्टाग्राम रिल स्पर्धा, ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’ सह विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

 

      राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जन्मदिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जात आहे.स्व सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात (1991-93) राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी केली.  "पाणी अडवा, पाणी जिरवा" हा मूलमंत्र देऊन त्यांनी  राज्यातील तीव्र  दुष्काळी परिस्थितीवर मात केली.  मोठ्या धरणांवर अवलंबून न राहता पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणावर भर दिला. माती नाला बांध, समतल चर, कंटूर बंडिंग, नाला बंडिंग अशा छोट्या संरचनांवर भर देऊन जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन केले. 1992 मध्ये त्यांनी स्वतंत्र जलसंधारण विभागाची स्थापना केली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळात लोकांना रोजगार निर्माण करून दिला आणि जलसाठे तयार केले.

 

      जलसंधारण दिनाच्या औचित्याने राज्यात 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत 'जलसंधारण सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे तसेच 21 ऑगस्ट रोजी सकाळी ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन  जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

 

      जिल्ह्यातही या सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये जलसाक्षरतेसाठी  जनजागृती  आणि शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये आणि संस्था स्तरावर विशेष कार्यशाळा. प्रबोधन रॅली, चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्र स्वच्छता आणि श्रमदान करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि जलसंधारण प्रतिज्ञा घेण्यात येत आहे. मृद व जलसंधारण रचनांची दुरुस्ती आणि तपासणी आदी कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

 

       जलसंधारण सप्ताहासोबतच पाणी टंचाईवर दीर्घकालीन मात करण्यासाठी 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2026  दरम्यान विशेष अभियान चालवले जात आहे. यामध्ये  बंधारे आणि पाझर तलावांची निर्मिती, सिमेंट नाला बांध बांधणे, विहीर पुनर्भरण आणि भूजल पुनर्भरण करणे, गाळ काढणे हे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. या अभियानात लोकसहभाग घेण्यात येणार आहे तसेच  प्रशिक्षण व क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे.

 

     "पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!" आणि "जल वाचवा, भविष्य घडवा!" असा संदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages