'आपले सरकार सेवा केंद्र' वाटपाची जुनी जाहिरात रद्द; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

'आपले सरकार सेवा केंद्र' वाटपाची जुनी जाहिरात रद्द;



 इच्छुकांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक

Ø नवीन जाहिरात लवकरच amravati.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल

            अमरावती, दि. ६ : शासन निर्णयातील निवड निकषांमध्ये बदल झाल्यामुळे 'आपले सरकार सेवा केंद्र' वाटपासाठी जून २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात तसेच त्या अनुषंगाने सुरू असलेली संपूर्ण निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशी सूचना जिल्हा सेतू समितीचे सचिव यांनी पत्राद्वारे दिली आहे.

            शासन निर्णय दि. २ जून २०२५ नुसार जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावतीमार्फत 'आपले सरकार सेवा केंद्र' वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी करणे तसेच पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, मुलाखतीची अंतिम प्रक्रिया प्रलंबित असतानाच निवडीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला.

            इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या दि. ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकानुसार नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्वीची जाहिरात आणि त्याअंतर्गत सुरू असलेली संपूर्ण निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

            नवीन निकषांनुसार 'आपले सरकार सेवा केंद्र' वाटपासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळ amravati.nic.in वर नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नवीन जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक सर्व उमेदवारांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.

            पूर्वीच्या (रद्द करण्यात आलेल्या) जाहिरातीनुसार प्राप्त झालेले अर्ज, कागदपत्रे किंवा अर्जातील माहिती नवीन निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी नवीन जाहिरातीनुसार विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह नव्याने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सेतू समिती, अमरावती यांनी केले आहे. यासंदर्भात संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages