सर्व दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा- मागणी
अमरावती दिनांक २७
संदीप सुने
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण स्फोटामागची धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे. राज्य शासनाच्या ९९ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीने केलेल्या प्राथमिक तपासात एक जळजळीत वास्तव उघड झाले आहे, ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, त्याला विद्युतदाब (व्होल्टेज) नियमित करणारे 'स्टॅबिलायझर' ( 'यूपीएस') यंत्राचे कवचच नव्हते. या आवश्यक यंत्रांअभावी विजेच्या चढ-उतारामुळे व्हेंटिलेटरच्या कॉम्प्रेसर प्रचंड उष्णतेने तापले, त्यामुळेच हा थरारक स्फोट झाल्याची दाट शक्यता समितीच्या चौकशीत पुढे आली आहे.
कर्मचाऱ्यांना आपत्कालीन प्रशिक्षण नाही!
दुर्घटनेत रुग्णालयात आपत्कालीन स्थितीत काय उपाययोजना कराव्यात, याचे कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्फोट झाल्यानंतर गोंधळ उडण्यामागे आणि यंत्रणा हाताळता न येण्यामागे हेच मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.
आरोग्य विभागाच्या स्थानिक समितीने तयार केलेला प्राथमिक अहवाल राज्य शासनाच्या या उच्चस्तरीय चौकशी समितीला सुपूर्द करण्यात आला आहे.
यामुळे संपूर्ण आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दोषी दिसत आहे.
आरोग्य उपसंचालक कार्यालय अकोला कसे?
महाराष्ट्र राज्याचे विभागीय महसूल ठिकाण अमरावती असताना आरोग्याचे उपसंचालक कार्यालय अकोला येथे देऊन आरोग्य मंत्रालयाने काय साध्य केले आहे? एकाच विभागीय ठिकाणी सर्व विभागांचे कार्यालय का नाही?
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) मध्ये नवजात बाळांचे मृत्यू प्रकरणी सर्वदोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्व जिल्हास्तरातून केली जात आहे.