ग्राम पंचायत शिरजगाव कसबा कडून घर टॅक्समध्ये अफाट वाढ: ग्रामस्थ व सदस्यांमध्ये तीव्र संताप, - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 27, 2026

ग्राम पंचायत शिरजगाव कसबा कडून घर टॅक्समध्ये अफाट वाढ: ग्रामस्थ व सदस्यांमध्ये तीव्र संताप,


CEO ना सोपवले निवेदन
आर्थिक अडचणींच्या काळात ६ पट टॅक्स वाढ

शिरजगाव कसबा दिनांक २६

डींगाबर सुने

(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)


             ग्राम पंचायत शिरजगाव कसबा द्वारे सन २०२५-२६ च्या नुकत्याच केलेल्या घर टॅक्स (गृह कर) मधील अवाजवी आणि अफाट वाढीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आणि संताप पसरला आहे. अचानक वाढवलेल्या टॅक्सच्या बोज्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून ही वाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी करत आहे. ग्राम पंचायतीच्या या निर्णयाचा विरोध केवळ आम नागरिकच करत नाहीत, तर ग्राम पंचायतीच्या सदस्यांनीही याविरोधात मोर्चा उघडला आहे. ९ डिसेंबर २०२५ ला ग्रामसभेनेही हा दरवाढीचा ठराव रद्द केलेला आहे.

     ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे की, टॅक्स वाढीचा निर्णय घेताना जनहित आणि ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा ठोस आधार नसताना टॅक्समध्ये एवढी मोठी वाढ करणे नियमांचे उल्लंघन आहे. गावातील सामाजिक संघटनांनीही आंदोलनाची भूमिका दर्शविली आहे.

जिल्हा परिषद CEO ना सोपवले निवेदन

वाढवलेल्या टॅक्सच्या विरोधात ग्राम पंचायत सदस्य तसेच माजी उपसरपंच रिझवान हुसैन आणि ग्राम पंचायत सदस्य अब्दुल नदीम यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची भेट घेऊन निवेदन सोपवले आहे.. निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, घर टॅक्समध्ये केलेली अवाजवी आणि अफाट वाढ तत्काळ रद्द करण्यात यावी. ग्राम पंचायतीच्या या निर्णयाची प्रशासकीय स्तरावर समीक्षा केली जावी. सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन आणि व्यवहार्य कर रचना तयार करण्यात यावी. निवेदनात नमूद करण्यात आले की, घर टॅक्स सन २०२४-२५ च्या तुलनेत सहा पट अधिक वाढवण्यात आला आहे. आधी दिवा बत्ती कर ₹५० आणि आरोग्य कर ₹५० होता, पण तो वाढवून आता दिवा बत्ती कर ₹३०० आणि आरोग्य कर ₹३०० करण्यात आला आहे, जो अत्यंत अन्यायकारक आहे.

आंदोलनाचा दिला इशारा

         ग्राम पंचायत सदस्यांनी स्पष्ट केले आहे की, जर प्रशासनाने या प्रकरणात लवकरात लवकर योग्य पाऊल उचलले नाही आणि वाढवलेला घर टॅक्स मागे घेतला नाही, तर ते मोठ्या प्रमाणावर जन-आंदोलन करतील.

गावातील सामाजिक संघटनांनीही या ग्रामपंचायत कर करवाढीला विरोध दर्शविलेला आहे‌.

प्रतिक्रिया-

१) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे सन २०१५ चे करवाढ परिपत्रक असल्यामुळे कर वाढ करण्यात आली आहे.

सुरेश रेखाते 

ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत 

 शिरजगाव कसबा 

२) करवाढ संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पंचायत समिती स्तरावर सुनावणी घेण्यात येईल.

सुरेश लांडगे 

पंचायत विस्तार अधिकारी पंचायत समिती चांदुर बाजार

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages