ईश्वरी ठाकरे दुर्घटनेला जबाबदार कोण?; स्कूलबसवर वाहक सक्तीची मागणी, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
चांदूरबाजार दिनांक २७
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे स्कूलबसच्या अपघातात विद्यार्थिनी ईश्वरी ठाकरे हिचा मृत्यू झालेला आहे. यामुळे जिल्ह्यातील स्कूलबसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या घटनेला केवळ अपघात म्हणून न पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षाची गंभीर बाब म्हणून पाहण्याची गरज असल्याचे सांगत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे चांदूरबाजार तालुकाध्यक्ष डॉ. राहुल अहिर यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तसेच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्कूलबसच्या सुरक्षिततेसंदर्भात तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यात यापूर्वीही स्कूलबसच्या अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहे. मात्र, प्रत्येक घटनेनंतर काही दिवस प्रशासनाकडून तपासणी व कारवाईची चर्चा होते आणि त्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे, अशी भूमिका पत्रकार संघाने निवेदनातून मांडली आहे.
स्कूलबसच्या प्रत्येक वाहनात प्रशिक्षित व जबाबदार वाहक ठेवणे सक्तीचे करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी संघाने केली आहे. लहान मुलांना सुरक्षितपणे बसमध्ये चढवणे-उतरणे, प्रवासादरम्यान त्यांच्यावर देखरेख ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करणे यासाठी वाहकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे संघाने स्पष्ट केले.यासोबतच प्रत्येक स्कूलबसची नियमित फिटनेस तपासणी, चालकाची पात्रता व अनुभव, वेगमर्यादा, वाहनातील सुरक्षा साधने, अग्निशामक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, सीसीटीव्ही तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सुरक्षित आसनव्यवस्था यांची काटेकोर तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलीस व ट्रॉफिक विभाग संशयास्पद
या विभागाचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपेक्षा महसूल वसुलीला प्राधान्य देणे अत्यंत दुर्दैवी आहे. परिवहन विभागाने अवैध वसुली किंवा केवळ दंडात्मक कारवाईपुरते मर्यादित न राहता स्कूलबसच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूलबसवर तात्काळ कठोर कारवाई करून त्या वाहनांची परवानगी व फिटनेस तपासण्यात यावा, अशी मागणी डॉ. राहुल अहिर यांनी केली आहे.
दरम्यान, शिक्षण विभागानेही जिल्ह्यातील सर्व शाळांना स्कूलबस सुरक्षेबाबत स्पष्ट निर्देश देऊन त्याची नियमित पडताळणी करावी. शाळा प्रशासन, स्कूलबस मालक, चालक आणि परिवहन विभाग यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलीआहे.या प्रकरणी पालकमंत्री बावनकुळे यांनाही निवेदन देण्यात आले असून, रिद्धपूर येथील दुर्घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
"आता आणखी एका निष्पाप विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहणार नाही. स्कूलबस सुरक्षेबाबत तातडीने कठोर निर्णय घेण्यात आले नाहीत, तर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा तालुकाध्यक्ष डॉ. राहुल अहिर यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने तत्काळ ठोस निर्णय घेऊन जिल्ह्यातील सर्व स्कूलबसची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांमधूनही होत आहे.