अमरावती शहरात हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी: - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 12, 2026

अमरावती शहरात हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी:

 

पोलीस प्रशासनाची प्रस्तावित अधिसूचना जारी

अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शहरात वाढती लोकसंख्या, वाहनांची मोठी वर्दळ आणि त्यामुळे होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील प्रमुख मार्गांवर हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी घालण्याबाबतची  प्रस्तावित अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

पोलीस उपायुक्त (मुख्यालय) प्रांजली सोनवणे यांनी मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम (१) (ब) आणि मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अन्वये मिळालेल्या अधिकारांनुसार हे प्रस्तावित आदेश पारित केले आहेत.  शहरात सन २०२४ ते जुलै २०२६ या काळात एकूण १,१०८ अपघात झाले आहेत. यातील २१२ प्राणघातक अपघातांमध्ये २४६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून ९१३ व्यक्ती गंभीर व किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रात सांगण्यात आले  आहे.

            दररोज सकाळी ६.३० ते रात्री २१.३० वाजेपर्यंत वाहनांना शहरात  प्रतिबंध असणार असून या वाहनांमध्ये  मालविरहित (खाली गाडी) वजन २,००० किग्रॅ (२ टन) पेक्षा जास्त असणारी सर्व हलकी व जड व्यावसायिक वाहने.  ज्या वाहनांची भारसहित वहन क्षमता २ टनांपेक्षा जास्त आहे अशी सर्व वाहने.  सर्व प्रकारची अति अवजड (मल्टी-ॲक्सल) वाहने. 

यावेळेत शहरातील जे मार्ग बंद राहतील  यामध्ये  मुख्य चौक व बायपास मार्ग : गौरी इन वा पॉइंट, वेलकम टी पॉइंट, पंचवटी, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गद्रे चौक, नवाथे चौक, बेनाम चौक, अलमास गेट, बडनेरा ते यवतमाळ वाय पॉइंट यांचा समावेश असेल. तसेच  नाका व अंतर्गत मार्गांमध्ये  राजुरा नाका, विद्यापीठ चौक, बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, इर्विन चौक, दीपक चौक, चित्रा चौक, टांगा पढाव, नागपुरी गेट चौक ते ट्रान्सपोर्ट नगर व भातकुली जकात नाक्यापर्यंत या मार्गांचा समावेश आहे.

             इतर महत्त्वाच्या मार्गांमध्ये  आर.टी.ओ. कार्यालय, शेगाव नाका, कठोरा नाका, पोते पाटील चौक, रहाटगाव बस स्टॉप, विभागीय आयुक्त कार्यालय मार्ग तसेच एम.आय.डी.सी. परिसराचा समावेश आहे.  कायमस्वरूपी बंद राहणाऱ्या मार्गांमध्ये  गांधी चौक ते रविनगर, गांधी चौक ते राजापेठ आणि गांधी चौक ते अंबापेठ मार्ग. तसेच  बजरंग टेकडी ते विलासनगर, पटवा चौक, मोरबाग, मसानगंज.  गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक.  शहरातील परकोटाच्या आतील दाट लोकवस्तीतील सर्व अंतर्गत मार्गाचा समावेश आहे.

 प्रवेशबंदीतून सूट आणि वेळ (अपवाद)अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यात पेट्रोल, डिझेल, गॅस, शासकीय धान्य वितरण वाहने, महापालिका कचरा संकलन, अतिक्रमण विभाग, पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेशबंदीतून पूर्ण सूट असेल. तसेच या वाहनांना ताशी २० किमीची वेग मर्यादा पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अन्नधान्य व कृषी माल वाहतूकीला सूट देण्यात आली असून याअंतर्गत  दररोज दुपारी ११.०० ते दुपारी १६.०० वाजेदरम्यान ठरवून दिलेल्या मार्गांवरून  जसेकी  रेल्वे मालधक्का बडनेरा, एमआयडीसी, कृषी उत्पन्न बाजार समिती या भागात वाहतुकीस परवानगी राहील.

            गौण खनिज वाहतूकीसंदर्भात काही सूचना देण्यात आल्या असून यानुसार  दररोज सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत विशिष्ट निर्धारित मार्गांवरून वाहतुकीस सूट देण्यात आली आहे.

            या अधिसूचनेबाबत नागरिकांना किंवा वाहनधारकांना काही आक्षेप अथवा सूचना असल्यास त्यांनी अधिसूचना जारी  झाल्यापासून ०७ दिवसांच्या आत आपले आक्षेप लेखी स्वरूपात पोलीस प्रशासनाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायदा १९८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ नुसार कठोर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.



--



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages