शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटींचे कृषी कर्ज वितरीत
अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने सोमवार, 17 ऑगस्ट 2026 रोजी अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे ‘कृषी कर्ज वितरण शिबीर’ आयोजित करण्यात आले या शिबिरात शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे वितरण करण्यात आले. शिबिराला अचलपूर व अंजनगाव तालुक्यातील शेतकरी तसेच विविध बचत गटांशी संबंधित सुमारे 800 महिला सहभागी झाल्या.
पथ्रोट येथील प्रसन्न लॉनवर आयोजित या कार्यक्रमात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक पुरुषोत्तम मीणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक रश्मिता पंचाले होत्या.अचलपूरच्या गटविकास अधिकारी कल्पना जायभाये, कोमल तायडे तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक सुनील पाण्डेय यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शेतकरी व बचत गटांच्या महिलांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असून, अशा प्रकारच्या आउटरीच कॅम्पच्या माध्यमातून बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले.
या शिबिरात शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे वितरण करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होऊन त्यांच्या कृषीविषयक उपक्रमांना चालना मिळणार आहे. अचलपूर व अंजनगाव तालुक्यातील शेतकरी तसेच विविध बचत गटांशी संबंधित सुमारे 800 महिला या शिबिरासाठी उपस्थित होत्या. शेतकरी व महिला बचत गटांना बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या विविध कृषी कर्ज योजना, वित्तीय सेवा तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित योजनांची माहिती देण्यात आली.
सुनील पाण्डेय यांनी प्रास्ताविकात सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत कृषी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच शेतकरी व बचत गटांना बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन निलेश वाघमारे यांनी केले,अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी तर आभार मानले. शेतकरी, बचत गटांच्या महिला, बँक अधिकारी व विविध विभागांच्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे हे शिबिर यशस्वी ठरले.