उत्कृष्ट ग्रंथालय आणि ‘ग्रंथमित्र’ पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 13, 2026

उत्कृष्ट ग्रंथालय आणि ‘ग्रंथमित्र’ पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

अमरावती, दि.१४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयामार्फत  देण्यात येणाऱ्या  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ आणि ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार’- सन २०२५-२६ साठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते आणि सेवकांनी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

 

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, जनतेला दर्जेदार ग्रंथालयीन सेवा मिळाव्यात आणि वाचन संस्कृतीला अधिक प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी दिले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार हा राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासनमान्य ग्रंथालयांना त्यांच्या वर्गांनुसार (अ, ब, क, ड) रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरवले जाते.  'अ' वर्ग ग्रंथालयास  रुपये १ लाख, 'ब' वर्ग ग्रंथालयास रुपये ७५ हजार, 'क' वर्ग ग्रंथालयास  रुपये ५० हजार आणि 'ड' वर्ग ग्रंथालयास रुपये  २५ हजारांची रोख रक्कम प्रदान करण्यात येते.

 

 डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार हा भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने देण्यात येणारा  राज्यस्तरीय पुरस्कार असून एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना  पुरस्कार स्वरूप प्रत्येकी  ५० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देण्यात येते. राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी  रुपये  २५ हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देण्यात येते. 

इच्छुकांनी आपले विहित नमुन्यातील संपूर्ण प्रस्ताव आवश्यक सर्व कागदपत्रांसह तीन प्रतीत आपल्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे  २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करता येणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages