4.13 कोटी रुपयांची तडजोड
अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे नुकतेच विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये प्रामुख्याने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 अंतर्गत येणाऱ्या 'धनादेश बाऊन्स' प्रकरणांवर तडजोडीसाठी भर देण्यात आला होता. संपूर्ण जिल्ह्यातून या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
विशेष लोक अदालत पार पाडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण 18 पॅनल (मंडळ) तयार करण्यात आले होते. या पॅनलमध्ये न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या लोक अदालतीसमोर एकूण 2 हजार 740 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 229 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये विशेष बाब म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या 4 जुन्या प्रकरणांमध्येही दोन्ही पक्षांत तडजोड घडवून आणण्यात यश आले. या संपूर्ण प्रक्रियेतून एकूण 4 कोटी 13 लाख 45 हजार 372 रुपयांच्या तडजोडीच्या रक्कमेचे दावे निकाली काढण्यात आले.
लोक अदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा उज्वला एम. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. या कार्यात जिल्हा न्यायाधीश-1 ए. जी. जोशी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, वकील वर्ग, बँक व पतसंस्थांचे प्रतिनिधी तसेच पक्षकारांचे सहकार्य लाभले. सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही लोक अदालत यशस्वी झाल्याचे सांगत सचिव संजय सहारे यांनी सर्वांचे आभार मानले.