1 सप्टेंबरपर्यंत मुदत
अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर पत्नी आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने 'विशेष गौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या पात्र उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
या विशेष गौरव पुरस्कारासाठी काही प्रमुख निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, ज्या माजी सैनिक किंवा वीर पत्नींच्या पाल्यांना इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत, ते या पुरस्कारासाठी पात्र ठरतील. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षात आयआयटी , आयआयएम आणि एम्स यांसारख्या देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश असेल. शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेले माजी सैनिक, वीर पत्नी अथवा त्यांचे पाल्यदेखील या गौरव पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.