समाज कल्याण विभागाचे आवाहन
अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास दि. 22 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत सर्व सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातात. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन स्वरूपात अर्ज जमा करावा. अमरावती शहरातील निंभोरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. 1, 2, 3 व निंभोरा) आणि संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, तसेच मुलींकरिता कॅम्प व जेल रोड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहे आणि तालुका स्तरावरील सर्व शासकीय वसतिगृहांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालय व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकृतीची अंतिम मुदत 22 जुलै 2026 राहील, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक माहिती व संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.