विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी व डेटा सायन्स अभ्यासक्रमास शासन मान्यता - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 1, 2026

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी व डेटा सायन्स अभ्यासक्रमास शासन मान्यता

 

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान सचिव विरसिंह रणसिंग

इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयास  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी आणि बी.एस्सी. डेटा सायन्स हे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्य शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. शासन निर्णयात महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला असून, संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, रोजगाराभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. त्याच ध्येयाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून या दोन्ही अभ्यासक्रमांना शासनाची मान्यता मिळाली आहे.

संस्थेने शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घालून दिलेल्या सर्व शैक्षणिक, पायाभूत आणि प्रशासकीय निकषांची यशस्वी पूर्तता केली. सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक शैक्षणिक सुविधा, ग्रंथालय, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत शासनाने ही मान्यता प्रदान केली आहे.

बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी या अभ्यासक्रमामुळे आरोग्य, औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, संशोधन आणि प्रयोगशाळा क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत. तर बी.एस्सी. डेटा सायन्स या अभ्यासक्रमामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा ॲनालिटिक्स, सॉफ्टवेअर उद्योग, बँकिंग, ई-कॉमर्स आणि विविध तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

या मान्यतेमुळे इंदापूर तालुक्यासह बारामती व परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, जागतिक स्तरावर मागणी असलेल्या अभ्यासक्रमांचे शिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होण्यासही मोठी मदत होईल.

संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. भविष्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संस्था कटिबद्ध असल्याचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आधुनिक उच्च शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाने  टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल शिक्षण क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages