व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांवर वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन
अमरावती, दि. १ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ): समाजाला, विशेषतः तरुण पिढीला अमली पदार्थांच्या घातक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि व्यसनाधीनतेविरुद्ध व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने 26 जून हा जागतिक मादकद्रव्य विरोधी दिन नुकताच साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक़ डॉ. विनोद पवार बाह्य संपर्क अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. प्रेषित मढवी, डॉ. ऋषिकेश घोरपडे यांच्यासह अधिसेविका श्रीमती ललिता अटाळकर, श्रीमती श्रद्धा हरकंचे, सारा बांगड ,सावली परतेती उपस्थित होते.
डॉ. विनोद पवार म्हणाले, मादक द्रव्यांचे सेवन हे मानवी शरीराचा आणि आरोग्याचा पूर्णपणे नाश करते. कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते. या गंभीर आजारातून आणि मानसिकतेतून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयामार्फत अत्यंत प्रभावी आणि आधुनिक औषधोपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. नरेंद्र सोळंके आणि डॉ. प्रेषित मढवी यांनी उपस्थितांना मादक द्रव्यांच्या सेवनामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होणारे परिणाम, मानसिक आजार आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी शास्त्रीय व सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा स्त्री रुग्णालय परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी, रुग्णालयीन कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सारा बांगड यांनी, तर आभार श्रद्धा हरकंचे यांनी मानले.