अमरावती, दि. १ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ): महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागातर्फे 22 जूनपासून संपूर्ण राज्यभरात 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा' सुरू करण्यात आली आहे. या संवाद यात्रेचा अमरावती जिल्हास्तरीय कार्यक्रम येत्या 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता शेगाव नाका येथील 'अभियंता भवन' येथे आयोजित करण्यात आला आहे. सलग 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत सुमारे 6 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार असून, राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये याचे संचलन होणार आहे. या यात्रेत राज्यातील हजारहून अधिक गोशाळा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या संपूर्ण प्रवासात 15 हजारांपेक्षा जास्त गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली जाईल.
रासायनिक शेतीला सक्षम पर्याय म्हणून देशी गायीच्या शेणावर आधारित नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील गोशाळा केवळ देणग्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहू शकतील, याचे मार्गदर्शन याद्वारे केले जाईल. यासोबतच शेण आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांविषयी (सेंद्रिय खते, औषधे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू) समाजात जनजागृती केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा आयोगाच्या विविध गोपालन योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, गोशाळा संचालकांच्या आढावा बैठका घेणे आणि पशुसंवर्धन विभाग व गोशाळांमध्ये उत्तम समन्वय साधणे यासाठी ही यात्रा कार्यरत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गोवंशाचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक गोरक्षकांमध्ये सलोख्याचा समन्वय साधणे, संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याच्या कायदेशीर बाबींविषयी समाजाला अवगत करणे, आणि स्थानिक देशी गोवंशाच्या संगोपनासंदर्भात वैज्ञानिक व पारंपरिक पद्धतींची माहिती देणे या प्रमुख वैशिष्ट्यांसह या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गोसेवक, गोरक्षक, शेतकरी, पशुपालक आणि गोशाळा संचालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.