राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण व अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 30, 2026

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण व अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर







एकल महिलांचा सन्मान, नशामुक्ती प्रदर्शन आणि महा. अंनिस अमरावती शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे यांची सर्वानुमते निवड


अमरावती, दि.३० जून : सामाजिक परिवर्तनाचा संदेश देत व्यसनमुक्त, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारा आणि महिला सन्मान जपणारा समाज घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावतीच्या व्यसनप्रबोधन व संघर्ष विभाग, महिला विभाग, विविध उपक्रम विभाग तसेच स्वराज्य वस्तीस्तर संघ, जेवड नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन तसेच विधवा/एकल महिला दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम, एकल महिला सत्कार, अंधश्रद्धा निर्मूलन विषयक मार्गदर्शन आणि नशामुक्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महादेव मंदिर सभागृह, जेवड नगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कल्पनाताई राजूरकर (अध्यक्ष, स्वराज्य वस्तीस्तर संघ) होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. जया संजय मंडवधरे (भारतीय महिला फेडरेशन), मा. मिलिंद तायडे (जनसंपर्क अधिकारी, रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती), मा. मनीषा टाकसाळ (मातृशक्ती संस्था), मा. वंदना हरणे (माजी नगरसेविका), मा. रजनी सवाई, मा. भूमिका पहूरकर, मा. उमा इंगोले तसेच मा. सुरेखा रंगारी यांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, वाढती गुन्हेगारी, रस्ते अपघात, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण आणि एकल महिलांसमोरील सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना मा. जया संजय मंडवधरे यांनी, "व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. घराघरातून व्यसनमुक्तीची चळवळ उभी राहिली तरच समाज निरोगी बनेल. त्याचबरोबर अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महिलांनी संघटित होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या व माजी नगरसेविका मा. वंदना हरणे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच एकल महिला म्हणून प्रेरणादायी कार्याबद्दल मा. शिलाताई मोकळकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या नशामुक्ती जनजागृती प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध माहितीपर फलक, व्यसनाचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, कुटुंबावर होणारे परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याविषयी नागरिकांना प्रभावी माहिती देण्यात आली. उपस्थितांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्तीचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल मंदा श्रीधर (जिल्हाकार्याध्यक्ष, महा. अंनिस, अमरावती) यांनी केले. मनाली इंगळे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. मंजू वासनिक यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांकडून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. विजया घोडेस्वार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला, तर मोनाली सदावर्ते यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती जिल्हा व शहर शाखेची पाक्षिक बैठक पार पडली. बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी जनजागृती उपक्रम, व्यसनमुक्ती अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, महिला सक्षमीकरण तसेच गावागावात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले. याच बैठकीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती शहर शाखेच्या अध्यक्षपदी मा. मिलिंद तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन खोब्रागडे, डॉ. संदीप महल्ले, विजया करोले, आशिष देशमुख, दिगंबर मेश्राम, लक्ष्मण तडस, राधा तिडके, भाग्यश्री शामतकर, प्रमिला प्रधान, कविता दवाळे, हर्षा दाभाडे, सुनीता कोसरे, अर्चना गायकवाड, उज्वला गडलिंग, रेखा दामले, रुपाली चोपकर, मेघा गावंडे, वैशाली हरणे, अनिता हरणे, नलिनी गजभिये, मीना वाकोडे, सुजाता गुलसुंदरे, कांचन मासोदकर, अनिता राऊत, शीतल मेश्राम, माधुरी धवणे, अर्चना राऊत, राणी गायकवाड तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वराज्य वस्तीस्तर संघाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

व्यसनमुक्त, अंधश्रद्धामुक्त, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारा आणि महिला सन्मानाला सर्वोच्च स्थान देणारा समाज निर्माण करण्याचा दृढ संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. सामाजिक परिवर्तनासाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित करत उपस्थितांनी अशा जनजागृती उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला. 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages