वनविभागात देशातील पहिली महिला डर्ट बाईक रायडर तुकडी तयार करणार!
दि.३० नागपूर:
वन्यजीव आणि निसर्ग संरक्षणाची खडतर जबाबदारी सांभाळणाऱ्या महाराष्ट्र वनविभागाच्या एका महिला वनरक्षकाने आपल्या अफाट धाडस, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इतिहास घडवला आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे कार्यरत असलेल्या महिला वनरक्षक आम्रपाली पडघन यांनी कन्याकुमारी ते काश्मीर हा ३,५३८ किलोमीटरचा प्रवास मोटारसायकलवरून एकटीने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची नोंद थेट 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' (India Book of Records) मध्ये करण्यात आली आहे.
दिनांक २३ जून २०२६ रोजी 'महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर' यांच्या वतीने या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव नोंदवून वनविभागाचा गौरव वाढवल्याबद्दल आम्रपाली यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.वन्यजीव आणि निसर्ग संरक्षणाची खडतर जबाबदारी सांभाळणाऱ्या महाराष्ट्र वनविभागाच्या एका महिला वनरक्षकाने आपल्या अफाट धाडस, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इतिहास घडवला आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे कार्यरत असलेल्या महिला वनरक्षक आम्रपाली पडघन यांनी कन्याकुमारी ते काश्मीर हा ३,५३८ किलोमीटरचा प्रवास मोटारसायकलवरून एकटीने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची नोंद थेट 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' (India Book of Records) मध्ये करण्यात आली आहे.
अवघ्या १०३ तास ३५ मिनिटांत मोहीम फत्ते
मूळच्या वाशिम जिल्ह्यातील असलेल्या आम्रपाली पडघन यांनी २ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५:१९ वाजता तामिळनाडू येथील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल, कन्याकुमारी येथून या प्रवासाला सुरुवात केली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२:५४ वाजता काश्मीरमधील श्रीनगर येथे पोहोचून हा प्रवास संपवला. त्यांनी हे ३,५३८ किलोमीटरचे अंतर अवघ्या १०३ तास ३५ मिनिटांत (म्हणजेच ४ दिवस, ७ तास आणि ३५ मिनिटे) पूर्ण केले.
हा प्रवास अतिशय थरारक आणि आव्हानांनी भरलेला होता. प्रवासादरम्यान त्यांना अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले:
प्रवासादरम्यान ग्वाल्हेर परिसरात झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे आम्रपाली यांचा मोबाईल फोन निकामी झाला, ज्यामुळे गुगल मॅपची साथ सुटली. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील फलक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मार्ग शोधला.
मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस, तर जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूरजवळ भीषण भूस्खलन (Landslide) झाले होते. रस्त्यावरील चिखलामुळे एका धोकादायक वळणावर त्यांची बाईक थेट दरीच्या दिशेने घसरली होती, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव आणि बाईक सावरली.
'सावित्रीची लेक' मोहिमेची प्रेरणा
प्रसिद्ध 'द मोटारसायकल डायरी' या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आम्रपाली यांनी एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी या मोहिमेला 'सावित्रीची लेक' असे नाव दिले होते. वनविभागात रुजू झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या कमाईतून घेतलेल्या बाईकवर कोणत्याही पूर्व नियोजित रेकॉर्डचा विचार न करता हा प्रवास सुरू केला, परंतु त्यांच्या याच जिद्दीने आज त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र वनविभागातून आणि प्रशासनातून कौतुकाचा वर्षाव होत आहे
देशातील पहिली महिला डर्ट बाईक रायडर तुकडी स्थापन होणार
या सत्कार प्रसंगी वनबल प्रमुखांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद घोषणा केली. आम्रपाली पडघन यांच्या या अद्भूत पराक्रमातून प्रेरणा घेऊन वन विभाग लवकरच देशातील पहिली 'महिला डर्ट बाईक रायडर' तुकडी तयार करणार आहे. दुर्गम जंगल क्षेत्रातील गस्त, वन्यजीव संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ही तुकडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल.
केवळ रायडर नव्हे, तर उत्तम सर्पमित्र!
सत्कार सोहळ्यात आम्रपाली यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक धाडसी पैलू समोर आला. त्या केवळ एक कुशल डर्ट बाईक रायडर नसून एक उत्तम सर्पमित्र देखील आहेत. वनरक्षक म्हणून कर्तव्यावर असताना त्यांनी आतापर्यंत कोब्रा (नाग), घोणस, मण्यार यांसारख्या अत्यंत विषारी आणि धोकादायक सापांना अत्यंत कौशल्याने पकडून त्यांचे प्राण वाचवले आहेत व त्यांना सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे.
वनरक्षक संघटनेकडून कौतुकाचा वर्षाव
महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्रपाली यांच्या जिद्दीचे कौतुक केले. एका महिला वनरक्षकाने कौशल्याच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संपूर्ण देशात वनविभागाचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments