*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : उर्ध्व वर्धा प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असल्यास तीन पाणीपाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दि. 31 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 95.50 किमीपर्यंत आणि डावा मुख्य कालव्याच्या 42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसचित नदी, नाल्यांवरील लाभधारकांना खरीप हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ या तत्वानुसार सिंचन करण्यात येणार आहे.
खरीप हंगामात दि. 1 जुलै ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मागणीप्रमाणे तीन पाणी पाळ्या देण्यात येतील. कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून दि. 31 जुलैपर्यंत सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35 मीटर पर्यतच्या विहिरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या ऊस, कापूस, केळी व फळबाग या नगदी पिकांसाठी पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के दर लागू राहणार आहे. यासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.