अमरावती, दि.२७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : उर्ध्व वर्धा जलाशयाच्या सभोवतालची जमीन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडीत क्षेत्राच्या काठाभोवतालची 342.50 मीटर ते 343 मीटर तलांकातील अमरावती जिल्ह्यातील 298.22 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 30.60 हेक्टर गाळपेर जमीन रब्बी हंगाम आणि तलांक 340 मीटर ते 342.50 मीटरमधील अमरावती जिल्ह्यातील 806 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 53 हेक्टर जमीन दरवर्षी उन्हाळी हंगामाकरीता उपलब्ध होऊ शकते.
ही गाळपेर जमीन भाडेपट्टीवर देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. भाडेपट्टीचा दर हा जलसंपदा विभागाच्या पत्रानुसार एका वर्षात दोन पिके घेतली गेल्यास प्रति हेक्टरी 2 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी आणि एका वर्षात एकच पिक घेतले गेल्यास प्रति हेक्टरी 1 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी भरणे आवश्यक आहे, असे उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.