महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित अर्जावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, December 20, 2025

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित अर्जावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना


अमरावती दि.२० :- राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत (महाआयटी) यांचेकडून विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांपासून विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सन २०१९-२० ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज मोठया प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज सादर करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त माया केदार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केल्या आहेत.

महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर मोठया प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. विविध स्तरावरील प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती अर्ज विहित कालावधीत निकाली काढण्याबाबत शासन, आयुक्तालय, प्रादेशिक कार्यालय आणि जिल्हा कार्यालयामार्फत विद्यार्थी व महाविद्यालयांना अवगत करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हा कार्यालयाकडून संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना वारंवार लेखी स्वरूपात कळविण्यात आलेले आहे. तसेच सोशल मिडियाचे व वृत्तपत्रांमधून सुद्धा जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

 केंद्र शासनाने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरिता सर्व राज्यांना दि.३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत दिलेली होती. तसेच सदरील मुदतवाढ दि.३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. तरी सुद्धा विद्यार्थी व महाविद्यालय यांचे कडून प्रलंबित अर्जाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.

सन २०१९-२० ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी प्रणालीवर विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेले अर्ज सन २०१८-१९ प्रमाणे Admin कडून Auto Reject  करण्याची शक्यता नाकारता येत नाही.


शैक्षणिक वर्ष सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीत महाडीबीटी प्रणालीवरील दि.१५ डिसेंबर, पर्यंत प्रलंबित अर्जाची जिल्हानिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

अमरावती जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर १२६९ तर महाविद्यालय स्तरावर १५६५ अर्ज प्रलंबित आहेत, अकोला जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर ११७० तर महाविद्यालय स्तरावर २४१३ अर्ज प्रलंबित आहेत, यवतमाळ जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर ४६८ तर महाविद्यालय स्तरावर १३८७ अर्ज प्रलंबित आहेत, बुलढाणा जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर ६५० तर महाविद्यालय स्तरावर १९०१ अर्ज प्रलंबित आहेत, वाशिम जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर ५९८ तर महाविद्यालय स्तरावर १६७१ अर्ज प्रलंबित आहेत.असे एकूण विभागातील मिळून सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी स्तरावर ४१५५ तर महाविद्यालय स्तरावर ८९३७ अर्ज प्रलंबित आहेत.

 

सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेल्या अर्जावर संबंधितांकडून सत्वर कार्यवाही न झाल्यास व विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयीन प्राचार्य यांची राहील असे प्रादेशिक उपायुक्त श्रीमती माया केदार यांनी सांगितले आहे.


 

--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages