आज संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, November 25, 2025

आज संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन




*संविधान दिन अमृत महोत्सवात कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : समाज कल्याण विभागातर्फे संविधान दिनाच्या अमृतमहोत्वसवी वर्षानिमित्त ‘घर घर संविधान’ उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमित्ताने बुधवारी, दि. 26 नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी 11 वाजता संविधान दिन जनजागृती अभियानाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या महर्षी रमण सभागृहात अभियानाचे उदघाटन, तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन, संविधान चित्ररथाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या उपक्रमात सर्व शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह, अनुदानित, विनाअनुदानित वसतिगृह, दिव्यांग संस्थांच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुषंगाने सहायक आयुक्त आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यामार्फत संविधानाची सर्वांना ओळख करून देण्यासाठी दरवर्षी दि. 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात उपक्रमात शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावण्यात येणार आहे.

शालेय परिपाठ, तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका, उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच भारतीय संविधानाबाबत माहिती देण्यासाठी व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहे. संविधान दिन कार्यक्रम आयोजित करून पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासोबतच संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संविधान संमेलनासह दि. 26 नोव्हेंबर 2025 ते दि. 26 जानेवारी 2026 दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त माया केदार आणि सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages