महाऊर्जा विभागीय कार्यालयात ‘माहिती अधिकार कार्यशाळा’ संपन्न
अमरावती, दि. 0८ : माहितीचा अधिकार अधिनियम हा केवळ कायद्यातील एक कलम नाही, तर लोकशाहीतील सामान्य नागरिकाला सशक्त करणारे शस्त्र आहे. योग्य माहितीच्या आधारे सामान्य माणूसही व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवू शकतो. ‘माहिती अधिकारी कायदा’ म्हणजे पारदर्शकतकडे वाटचाल करणारी शक्ती आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅड. राजेंद्र पांडे यांनी काल येथे केले.
राष्ट्रीय माहिती अधिकार सप्ताहानिमित्त महाऊर्जा विभागीय कार्यालयाच्या वतीने सोमवारी (ता. 6 ऑक्टोबर) एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे, प्रकल्प अधिकारी हर्षल काकडे यांच्यासह महाऊर्जा विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विभागीय महाव्यवस्थापक श्री. तायडे यांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व विशद करताना सांगितले की, हा कायदा सामान्य माणसाच्या हाती दिलेले लोकशाहीचे बलवान हत्यार आहे. माहिती ही पारदर्शक व जबाबदार प्रशासनाची पूर्वअट आहे. त्यामुळे हा कायदा केवळ माहिती मिळवण्यासाठी नव्हे, तर जबाबदारी निश्चित करण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे.
अॅड. पांडे यांनी आपल्या सखोल मार्गदर्शनात माहिती अधिकार कायद्यातील प्रमुख कलमांची सुलभ व्याख्या सांगितली. ते म्हणाले की, माहिती संदर्भात मागण्या, उत्तर देण्याची कालमर्यादा, माहिती न दिल्यास कायदेशीर पर्याय, अपिलीय यंत्रणा आणि न्यायप्रविष्ट प्रक्रियांचे मार्ग याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रत्यक्षात घडलेल्या प्रेरणादायी घटनांचा उल्लेख करत ॲड. पांडे यांनी स्पष्ट केले की, कधी कधी एक छोटासा माहितीचा अर्ज एखाद्या मोठ्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकू शकतो. त्यामुळे नागरिकांनी निडरपणे माहिती मागावी आणि प्रशासनाने पारदर्शकतेने ती पुरवावी, हाच या कायद्याचा मूळ गाभा आहे.
कार्यशाळेच्या शंका-समाधान सत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवांचे कथन करुन विविध शंकाचे निराकरण करुन घेतले. प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, माहिती देताना घ्यावयाची दक्षता, तसेच अर्जदारांच्या मनोभूमिकेचा विचार कसा करावा याबाबतही यावेळी सखोल चर्चा झाली. उपस्थितांनी कार्यशाळेतील संवाद मुलकता आणि ज्ञानपर मांडणीचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाऊर्जा विभागाच्यावतीने प्रकल्प अधिकारी श्री. काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, ही कार्यशाळा म्हणजे केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून, माहिती अधिकाराच्या चळवळीला अधिक व्यापक आणि प्रभावी दिशा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विभाग म्हणून आम्ही माहितीच्या अधिकाराचे संपूर्ण पालन करत राहू. महाऊर्जा विभागाची ही कार्यशाळा म्हणजे माहिती अधिकार कायद्याबाबत केवळ प्रशिक्षण नव्हे, तर एक वैचारिक चळवळ उभी करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. लोकशाहीतील पारदर्शकतेचा मूलभूत विचार या कार्यशाळेच्या केंद्रस्थानी होता, आणि त्या विचारांची रुजवणूक अधिक व्यापक प्रमाणावर करण्याचा निर्धार यामधून प्रकर्षाने जाणवला. ही कार्यशाळा म्हणजे माहिती अधिकाराच्या सशक्त अंमलबजावणीची नवी पायरीच ठरली, असा मनोदय यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
Post a Comment
0 Comments