अमरावती, दि. 0७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE व PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाचे आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून भरण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे पुणे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
यानुषंगाने नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची तारीख 20 ऑक्टोबर आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी दि. 8 सप्टेंबर 2025 ते उपरोक्त नमूद कालावधीत नियमित शुल्काने आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क RTGS/NEFT द्वारे भरणा करावे. शुल्क जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये "Draft" चा "Send to Board" व Payment Status मध्ये "Not Paid " चा "Paid" असा बदल झाला आहे. याची खातरजमा संबंधित शाळा, महाविद्यालयांनी करावी.
शुल्क जमा केलेली RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल, याची सर्व उच्च माध्यमिक शाळाप्रमुख/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.
सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढीलप्रमाणे महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे UDISE मधील PEN-ID वरुन भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. UDISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी), व्यवसाय अभ्यासकम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावीत. ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी, असेही राज्य मंडळाव्दारे कळविण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments