५ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने महिला दुग्ध उत्पादकांसाठी डिजिटल क्रांती
अमरावती, दि. ८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): द्वार ई-रजिस्ट्री आणि अमरावती जिल्ह्यातील पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येत ‘अमरावती अन्नक्षेत्र प्रायव्हेट लिमिटेड’या नाविन्यपूर्ण डेअरी उपक्रमाची सुरुवात केली आहे. या माध्यमातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना, विशेषतः महिलांना, थेट व्यापाराच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या ८ महिन्यात सुमारे ६ लाख लिटर दूध खरेदी करण्यात आले असून दुधाच्या एकूण विक्री मूल्याच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
अमरावती अन्नक्षेत्र प्रा.लि.कडे सध्या दररोज १० हजार लिटर दूध संकलनाची क्षमता असलेली पाच दूध संकलन केंद्र जिल्ह्यात कार्यरत आहेत. या माध्यमातून अमरावती परिसरातील १५० हून अधिक महिला दुग्ध उत्पादक शेतकरी जोडल्या गेल्या आहेत.
दूध संकलन प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फॅट आणि एसएनएफची अचूक गुणवत्ता तपासणी केली जाते. तसेच दुधाच्या एकूण विक्री मूल्याच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांना देण्यात येते. सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत कंपनीने सुमारे ६ लाख लिटर दूध खरेदी केले असून, त्यातून सुमारे २.५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
कंपनीकडून केवळ दूध खरेदी न करता दुग्ध उत्पादकांना रास्त दरात उच्च प्रतीचा गुरांचा चारा, मिनरल मिक्सचर तसेच सायलेंज (मुरघास) उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे दुधाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. यासोबतच जनावरांची संख्या वाढविण्यासाठी पशुधन कर्ज आणि जनावरांचा विमा मिळवून देण्यासाठीही कंपनी पुढाकार घेत आहे.
ग्रामीण भागातील दुग्ध उत्पादकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. दुग्ध व्यवसायात महिलांचा मोठा सहभाग असल्याने डिजिटल तंत्रज्ञान, पारदर्शक व्यवहार आणि थेट विक्रीच्या माध्यमातून महिला दुग्ध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.‘हब-अँड-स्पोक’ मॉडेल स्वीकारले असून, आगामी काळात इतर टियर-२ व टियर-३ शहरे तसेच ग्रामीण भागात या मॉडेलचा विस्तार करण्यात येणार आहे.

