हजारो शिक्षकांच्या साक्षीने डॉ. संगीता शिंदे - बोंडे यांचं भव्य शक्ती प्रदर्शना करत उमेदवारी दाखल - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, October 6, 2026

हजारो शिक्षकांच्या साक्षीने डॉ. संगीता शिंदे - बोंडे यांचं भव्य शक्ती प्रदर्शना करत उमेदवारी दाखल



पाचही जिल्ह्यांतून शेकडो शिक्षकांची उपस्थिती

विजयाचा निर्धार केला बुलंद

मी नाही तर प्रत्येक शिक्षक आमदार होणार – डॉ. संगीता शिंदे-बोंडे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व शिक्षण संघर्ष संघटनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून भक्कम पाठबळ



अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक नवा इतिहास रचला गेला. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, अनियमितता आणि शिक्षकांवर होणारे अन्याय दूर करून 'शिक्षण क्षेत्रातील कलंक' मिटवण्यासाठी हजारो शिक्षक बंधू-भगिनींच्या साक्षीने डॉ. संगीता सचिंद्र शिंदे – बोंडे यांनी अत्यंत भव्य आणि अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अमरावतीच्या संपूर्ण शहरात आज शिक्षकांच्या बुलंद आवाजाचा गजर पाहायला मिळाला.


पालकांचे आशीर्वाद अन् आई-वडिलांच्या स्मरणाने कार्याचा प्रारंभ


उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. संगीता शिंदे यांनी आपले वडील तथा माजी मुख्याध्यापक सुखदेवराव बोंडे, आई त्रिवेणी बोंडे आणि वहिनी वसुधा अनिल बोंडे यांचे भावूक वातावरणात आशीर्वाद घेतले. कुटुंबियांच्या शुभेच्छानंतर त्यांनी अमरावती येथील अभियंता भवनाकडे प्रस्थान केले, जिथे विभागातील पाचही जिल्ह्यांतून (अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम) आलेला शिक्षकांचा जनसागर ओसंडून वाहत होता.


कर्तुत्वशून्य लोकांनी शिक्षण क्षेत्र नासवले – डॉ. संगीता शिंदे आक्रमक


अभियंता भवन येथील तुफान गर्दीने गजबजलेल्या मेळाव्यात बोलताना डॉ. संगीता शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार तोफ डागली. कर्तुत्वशून्य लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण शिक्षण क्षेत्र नासवून ठेवले आहे. यामुळे महाराष्ट्रभर आपल्या पवित्र शिक्षक पेशाची बदनामी झाली. ही झालेली बदनामी भरून काढण्यासाठी आणि शिक्षकांचा स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठी आता सर्व शिक्षकांनी एकजूट होण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, या निवडणुकीत मी एकटी आमदार होणार नसून, विधान परिषदेत प्रवेश करणारा प्रत्येक शिक्षक बंधू-भगिनी स्वतः आमदार असेल

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास व जुन्या पेन्शनचा लढा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात घडवून आणलेले अमूलाग्र बदल, घेतलेले ऐतिहासिक निर्णय याच विचारांचे व्रत आपण पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू करणे विनाअनुदानित शाळांचे प्रश्न मार्गी लावणे आणि शिक्षकांच्या विविध न्याय्य मागण्या आपल्या अजेंड्याच्या केंद्रस्थानी असतील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.


शिक्षक परिषदेच्या दिग्गजांची मेळाव्याला भक्कम उपस्थिती


या ऐतिहासिक मेळाव्याला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार नागो गाणार, सर कार्यवाह राजकुमार बोनकीले, जिल्हाध्यक्ष राजेश मदने, तसेच विक्रम ठाकरे, मनोहर आंडे, शरद तिरमारे, पद्माकर घोगरे, एकनाथ पवार, आशिष सोनार, अशोक भराड, अशोक कोल्हे, अविनाश रोकडे, प्रशांत कवर, विजय भड, अविनाश पाटील, प्रकाश हरणे, विजय दाणे, अरविंद अपाले, अनंतराव सुपनकर,  अजिज राहत, दिनेश धोटे, कानतोडे, शुंभंगी आवारी, अनिता चेचरे, कृपा पटेल, उषा धुर्वे, रंजना माहुरे, अनंत भगवान गरुडे, प्रवीण पेटकर, गणेश सानप यांच्यासह राज्यभरातील दिग्गज शिक्षक नेते, पदाधिकारी व हजारो शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यानंतर अभियंता भवनापासून निघालेल्या तुफान रॅलीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देत अर्ज दाखल केला. या प्रचंड जनसमुदायामुळे आणि संघटनांच्या भक्कम पाठिंब्यामुळे डॉ. संगीता शिंदे बोंडे यांची उमेदवारी अतिशय मजबूत झाली असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.


शिक्षकांची स्वाभिमान वर्गणी, ना पैठणी, ना पैसे... फक्त निष्ठा


अमरावतीच्या अभियंता भवनातील मेळाव्यात एक अत्यंत भावूक आणि स्वाभिमानाचा प्रसंग पाहायला मिळाला. ही निवडणूक कोणत्याही धनदांडग्याच्या पैशांवर न लढता, पूर्णपणे शिक्षकांच्या आशीर्वादावर लढण्याचा संकल्प डॉ. संगीता शिंदे - बोंडे यांनी केला आहे.
यासाठीच मेळाव्याच्या ठिकाणी एक विशेष डोनेशन बॉक्स' (वर्गणी पेटी) ठेवण्यात आली होती.  शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार पुसण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या उमेदवाराला विधान परिषदेत पाठवण्यासाठी उपस्थित हजारो शिक्षक बंधू-भगिनींनी उत्स्फूर्तपणे स्वतःच्या कष्टाची वर्गणी या बॉक्समध्ये जमा केली.
आम्ही पैसे किंवा भेटवस्तू घेणार नाही, तर आमच्या प्रतिनिधीला स्वतःच्या वर्गणीतून निवडून आणू! असा नवा आदर्शच अमरावती विभागातील शिक्षकांनी आज घालून दिला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages