सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थांमध्ये होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी आणि भाविकांना दर्जेदार भोजन मिळावे यासाठी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण वर्षभरासाठी एक थेट 'स्थायी आदेश' जारी केला आहे. भारताच्या इतिहासात सर्व धर्मीयांच्या सणांसाठी असा एकत्रित कायमस्वरूपी आदेश काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या नवीन नियमांनुसार, आता राज्यात कुठेही आयोजित होणाऱ्या सार्वजनिक महाप्रसाद, भंडारा, लंगर, इफ्तार मेजवानी किंवा अन्नछत्राच्या ठिकाणांची FDA अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली जाईल.
सार्वजनिक मोफत अन्नदान किंवा भंडाऱ्याचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस आधी स्थानिक FDA अधिकाऱ्याला फॉर्म भरून लेखी माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे.
सामूहिक अन्न शिजवण्यासाठी आयोजकांना केवळ अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नोंदणीकृत किंवा परवानाधारक (Licensed) आचाऱ्यांची/केटरर्सचीच मदत घ्यावी लागेल.
अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे तेल, मसाले किंवा इतर कच्चे माल हे केवळ परवानाधारक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी केलेले असावेत आणि त्यांची बिले सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. खाद्यरंगांचा वापर मर्यादेत आहे की नाही, याचीही कडक तपासणी होईल.
या स्थायी आदेशाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी वर्षभरातील सणांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे:
प्रथम श्रेणी (राज्यव्यापी सण): गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ यांसारखे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरे होणारे सण.
द्वितीय श्रेणी (प्रादेशिक उत्सव): ठराविक भागापुरती मर्यादित असणारी मोठी जत्रा, प्रादेशिक यात्रा आणि उरूस.
तृतीय श्रेणी (स्थानिक सण): स्थानिक पातळीवर साजरे होणारे छोटे सण किंवा धार्मिक विधी.
नियम न पाळणाऱ्या किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न वाटप करणाऱ्या आयोजकांवर आणि भेसळखोरांवर सण संपल्यानंतर १४ दिवसांच्या आत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून थेट न्यायालयात खटले भरले जातील, असा कडक इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.