वृक्षांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश
शिरजगाव कसबा, दि. ५
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क )
श्री. बाल मुकुंद राठी विद्यालय, शिरजगाव कसबा येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षांना राखी बांधण्याचा अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून “वृक्षांचे संरक्षण करा, पर्यावरण वाचवा” असा आगळावेगळा संदेश देण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या राख्या इयत्ता नववी ‘ब’च्या विद्यार्थिनी व त्यांच्या समूहाने स्वतः तयार केल्या. विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेतून आकर्षक राख्या तयार करून विद्यालय परिसरातील वृक्षांना त्या राख्या बांधल्या आहे. या माध्यमातून वृक्षांप्रती प्रेम, जिव्हाळा आणि पर्यावरण संवर्धनाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर नवलकर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. काळे व श्री. हेडा , तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागातून हा कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला आहे.
वृक्ष हे मानवाच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. इयत्ता नववी ‘ब’च्या विद्यार्थिनी व त्यांच्या समूहाने तयार केलेल्या राख्यांमुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वृक्षांना राखी बांधून त्यांच्याशी नाते जोडण्याचा हा अभिनव उपक्रम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.