अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यभरात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांनी यानिमित्ताने विविध उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त कार्यालय व स्थानिक पातळीवर सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, परिसंवाद आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. समाजकार्यात विशेष योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा विशेष सत्कार व गौरव करण्यात यावा. ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, त्यांच्यासाठीच्या शासकीय योजना, वैद्यकीय सोयी-सुविधा आणि मदतीसाठी असलेल्या हेल्पलाइनबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात सुसह्य जीवन जगता यावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे आणि त्यांना राज्य शासनाच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाचा पूर्ण लाभ मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहे.