सात दिगंबर जैन मंदिरांचा ऐतिहासिक संगम
मुनीश्री १०८ निराकारसागर महाराज, मुनीश्री १०८ निर्माणसागर महाराज व मुनीश्री १०८ उत्साहसागर महाराज यांच्या सानिध्यात क्षमावाणी पर्व उत्साहात साजरे
अमरावती : जैन समाजातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असलेल्या पर्युषण महापर्वाची सांगता अमरावतीत क्षमावाणी पर्वानिमित्त भव्य शोभायात्रेने करण्यात आली. सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने शहरातील सात दिगंबर जैन मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांचा समारोप क्षमावाणी पर्वाच्या निमित्ताने करण्यात आला. तप, क्षमा, साधना आणि आत्मकल्याणाचा संदेश देणाऱ्या या पर्वानिमित्त मुनीश्री १०८ निराकारसागर महाराज, मुनीश्री १०८ निर्माणसागर महाराज आणि मुनीश्री १०८ उत्साहसागर महाराज यांच्या पावन सानिध्यात भव्य पालखी व शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी श्रावक-श्राविकांनी एकमेकांची क्षमायाचना करून अहिंसा, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश दिला.
सकाळी ७ वाजता श्री आदिनाथ दिगंबर जैन परवार मंदिरात श्रीजींचा अभिषेक व पूजन करून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर भगवान श्रीजींची प्रतिमा पालखीत विराजमान करून भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा सराफा, बर्तन बाजार, जवाहर गेट, तहसील रोड, राजकमल, गांधी चौक, बुधवारा आणि दहीसाथ मार्गे षटखंडागम भवन येथे पोहोचली. तेथे श्रीजींचा अभिषेक, शांतिधारा तसेच आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे पूजन करण्यात आले.
या शोभायात्रेत श्रावकांनी पांढरी वस्त्रे परिधान केली होती, तर श्राविकांनी लाल रंगाच्या बांधणी साड्या परिधान करून सहभाग घेतला होता. पूज्य मुनी महाराज स्वतः शोभायात्रेत सहभागी होऊन मार्गक्रमण करीत असल्याने भाविकांसाठी हा अत्यंत भाग्याचा आणि अविस्मरणीय क्षण ठरला. शहरातील विविध मार्गांवर जैन समाजबांधवांनी पुष्पवृष्टी करून तसेच पूजन व आरती करून मुनी महाराज आणि शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले.
भगवानांच्या पालखीतील प्रतिमेचे ठिकठिकाणी पूजन करून भाविकांनी ईश्वरचरणी क्षमायाचना केली. तसेच सृष्टीतील सर्व जीवांना क्षमा करून त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना करण्यात आली. क्षमावाणी पर्वाच्या माध्यमातून मनातील राग, द्वेष आणि कटुता दूर करून परस्परांमध्ये प्रेम, सद्भावना आणि मैत्री वृद्धिंगत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
दहा दिवसांचे उपवास करणाऱ्या तपस्वींचा सन्मान
पर्युषण महापर्वाच्या काळात अमरावतीतील ज्या श्रावकांनी निर्जल दहा दिवसांचे उपवास, दिवसातून एकदाच जलग्रहण करून उपवास, सात दिवसांचे उपवास तसेच पाच दिवसांचे निर्जल उपवास केले, अशा तपस्वींचा अमरावती दिगंबर जैन मंदिराच्या सर्व विश्वस्तांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या कठोर तपश्चर्येची अनुमोदना करून त्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी तपस्वींच्या त्याग, संयम आणि धार्मिक निष्ठेचे कौतुक करण्यात आले.
यानंतर क्षमावाणी पर्वानिमित्त तिन्ही मुनी महाराजांचे प्रवचन आयोजित करण्यात आले. त्यांच्या प्रवचनातून क्षमा, अहिंसा, संयम, त्याग आणि आत्मशुद्धीचे महत्त्व विशद करण्यात आले. पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने संपूर्ण अंबानगरीचे जणू धर्मनगरीत रूपांतर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील जैन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला.
सात दिगंबर जैन मंदिरांचा ऐतिहासिक एकोपा
अमरावती शहरात दिगंबर जैन समाजाची सात विविध मंदिरे असून, दरवर्षी पर्युषण महापर्वानिमित्त प्रत्येक मंदिरात स्वतंत्रपणे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा प्रथमच या सातही मंदिरांतील समाजबांधवांनी एकत्र येत क्षमावाणी पर्व साजरे केले. सातही मंदिरांचा संयुक्त सहभाग, भगवानांची भव्य पालखी, शहरातून काढण्यात आलेली शोभायात्रा आणि पूज्य मुनी महाराजांची उपस्थिती यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
अमरावतीच्या इतिहासात प्रथमच सातही दिगंबर जैन मंदिरांनी एकत्रितपणे क्षमावाणी पर्व साजरे केल्याने समाजातील एकता, बंधुभाव आणि धार्मिक ऐक्याचे दर्शन घडले. वर्ष २०२१ नंतर २०२६ मध्ये पुन्हा एकदा अमरावतीत गुरुकृपेने चातुर्मासाचा मंगल संयोग प्राप्त झाल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते.
या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे पर्युषण महापर्व केवळ धार्मिक उत्सव न राहता सातही मंदिरांतील समाजबांधवांच्या एकतेचा, श्रद्धेचा आणि सामूहिक भक्तीचा ऐतिहासिक संगम ठरला. आयोजन समितीच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्यात शेकडो जैन श्रावक-श्राविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.