यादीतील सुधारणेसाठी बीएलओशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि.१४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात जिल्ह्यातील ३ लाख ३० हजार ४०१ मतदार वगळण्यात आले आहेत. वगळण्यात आलेल्या मतदारांच्या नावाची यादी amravati.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वगळलेल्या मतदारांच्या यादीत नाव असल्यास तातडीने बीएलओंशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गणना अर्जांचे वितरण व डिजिटायझेशनचे काम सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत प्रणालीवर ११ ऑगस्ट २०२६ रोजी ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. एसआयआर अंतर्गत जिल्ह्यातील २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांना गणनापत्रक वाटप करण्यात आले. त्यानुसार १ लाख ८ हजार १०९ मयत मतदार, १५ हजार ३०७ गैरहजर मतदार, १ लाख ५३ हजार ८३३ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, १ हजार २ इतर मतदार आणि ५२ हजार १५० यापूर्वीच नोंदणी झालेले मतदार मतदारयादीतून वगळण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्व नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी यादीचे अवलोकन करावे. पात्र मतदाराचे नाव पत्ता सापडला नसल्यास किंवा 'अनकलेक्टेड' वर्गवारीमध्ये समाविष्ट झाले असल्यास अथवा त्यांनी गणनापत्रक जमा केले नसल्यास, त्यांनी त्वरित संबंधित बीएलओशी संपर्क साधून गणनापत्रकात अचूक माहितीसह भरावी, तसेच गणना पत्रक जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
0 Comments