आदिवासी आश्रमशाळांतील ४६८ शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

 



पवित्र पोर्टलवर पदनिहाय जाहिरात प्रसिद्ध;

१३ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम नोंदविण्याचे आवाहन

अमरावती, दि. १२ :  अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अधिनस्त असलेल्या धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद आणि कळमनुरी या सात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रातील ८५ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक संवर्गातील ४६८ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अनुसूचित (पेसा) तसेच अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन-पेसा) शासकीय आश्रमशाळांमधील रिक्त पदांची पदनिहाय जाहिरात ६ ऑगस्ट २०२६ रोजी (पवित्र) पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया मुलाखतीशिवाय करण्यात येणार आहे.

या भरतीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम), प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) आणि प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) या पदांचा समावेश आहे.

शिक्षक पदभरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या (पवित्र पोर्टलवरील अधिकृत संकेतस्थळ) येथे जाऊन पदांची उपलब्धता, पात्रता व पात्रतेसंबंधी आवश्यक माहिती तपासून विहित वेळेत अर्ज प्रक्रियेतील पुढील कार्यवाही पूर्ण करावी.

पवित्र पोर्टल प्रणालीवर उपलब्ध पदे विचारात घेऊन पात्र उमेदवारांना आपला पसंतीक्रम ६ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नोंदविता येणार आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत पसंतीक्रम नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन अमरावतीचे अपर आयुक्त, आदिवासी विकास संदीप गोलाईत यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.


 

Post a Comment

0 Comments