अमरावती दिनांक २१
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
अ.भा.ग्रा.पत्रकार संघ महिला मंच चा उपक्रम
महिलांनो मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका - कंचन मुरके यांचे आवाहन
महिलांच्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी देऊरवाडा येथील हिरकणी सभागृहात ‘महिलांचे मानसिक आरोग्य आणि ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच च्या वतीने स्नेह मिलन सोहळा व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेह मिलन सोहळ्याची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजन हार अर्पण व द्दीप प्रज्वलन करून करण्यात आली.या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे .
कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध लेखिका,पत्रकार,तसेचं अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच प्रदेशाध्यक्ष कंचन मुरके यांनी महिलांचे शारीरिक आरोग्य जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे मानसिक आरोग्यही जपले गेले पाहिजे, यावर त्यांनी आपल्या व्याख्यानात विशेष भर दिला.
ताणतणावाची कारणे मांडतांना त्यांनी कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक पातळ्यांवर कसरत करताना महिलांमध्ये निर्माण होणारा ताण आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यावर प्रकाश टाकला आहे.
सततची चिडचिड, निद्रानाश, थकवा आणि नैराश्य यांसारख्या लक्षणांकडे वेळेवर लक्ष देणे किती गरजेचे आहे, हे समजावून सांगितले. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणे,नियमित व्यायाम, योगासने, समतोल आहार आणि आपल्या भावना व्यक्त करण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
सध्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. परस्परसंवादाचा अभाव, आर्थिक ताणतणाव, विसंगत विचार, अहंकार आणि महिलांचे आर्थिक व व्यक्तिगत स्वातंत्र्य ही यामागील प्रमुख कारणे आहेत. मुळात सहनशीलता संपलेली आहे त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढते आहे याचा आवर्जून मुला-मुलींनी दोघांनीही विचार करायला हवा असे मत त्यांनी मांडले.
मोबाईल दुष्परिणाम विषय बोलतांना त्यांनी म्हटले की, आजकाल मूल रडलं की त्याच्या हातात मोबाईल दिला जातो, मूल जेवत नसेल तरी स्क्रीन दाखवली जाते. हळूहळू या सवयीचं रूपांतर व्यसनात होतं. अतिमोबाईलमुळे मुलांची नजर कमजोर होणे, चिडचिड वाढणे, अभ्यासात लक्ष न लागणे आणि मैदानी खेळांपासून मुले दूर जाणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत.
पण, मुलांना या जाळ्यातून बाहेर काढणं अशक्य नाही. मुलं उपदेशाने नाही, तर अनुकरणाने शिकतात. आपण स्वतः मुलांसमोर सतत मोबाईल वापरत असू, तर त्यांना दोष देऊन उपयोग नाही.
मुलांचा मोबाईल घालवला, तर त्यांना खेळण्यासाठी किंवा रमण्यासाठी पर्याय द्या. त्यांना मैदानी खेळ, चित्रकला, संगीत, किंवा अवांतर वाचनाची सवय लावा.
मुलांना अभ्यासासाठी किंवा मनोरंजनासाठी मोबाईल द्यावाच लागला, तर त्याचा वेळ आणि नियमांचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घघाटन मनोहर सुने संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे कांताताई काळे समाजसेविका, सुरेखा दामेधर माजी जि. प. सदस्य, राजेंद्र ठाकरे प्रदेश सरचिटणीस,जयश्री पंडागडे केंद्रीय सदस्य, किरण सिंनकर उपाध्यक्ष पत्रकार सहकारी पतसंस्था, किशोर बरडे महानगर अध्यक्ष, जयसिंग ठाकूर तालुका संघटक, मीरा खडसे,ज्योती कपले,नीलिमा टिंगणे हजर होते.
आजच्या डिजिटल युगामध्ये आजही सावित्रीबाई फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजविणे गरजेचे असल्याचे मत सुरेखा दामेधर यांनी व्यक्त केले आहे. महिला स्नेह मेळाव्याला ग्रामीण भागातून महिलांची विशेष उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महिलां मंच जिल्हाध्यक्ष नीलिमा निमकर यांनी केले आहे.
आजच्या डिजिटल युगामध्ये आजही सावित्रीबाई फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजविणे गरजेचे असल्याचे मत सौ.सुरेखा दामेधर यांनी व्यक्त केले आहे. महिला स्नेह मेळाव्याला ग्रामीण भागातून महिलांची विशेष उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महिलां मंच जिल्हाध्यक्ष सौ. नीलिमा निमकर यांनी केले आहे.