महारक्तदान शिबिरात 1298 रक्त पिशव्यांचे संकलन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, August 18, 2026

महारक्तदान शिबिरात 1298 रक्त पिशव्यांचे संकलन

 


अमरावती, दि.१८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाच्या महारक्तदान शिबिरात 1 हजार 298 रक्तदात्यांनी रक्तदान करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. हॉटेल ग्रँड महफील येथील रुबी हॉल येथे शिबीर पार पडले.

 

या शिबिरादरम्यान शहरात 1 हजार 187 रक्त पिशव्या, तर धारणी तालुक्यात 111 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार प्रविण पोटे पाटील, संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, महापालिकेच्या शिक्षण सभापती प्रिती रेवणे, सुनील देशमुख जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी उपस्थित होते.


 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर यांनी आतापर्यंत यवतमाळ, अहिल्यानगर, बुलढाणा, वाशीम आणि अमरावती येथे 17 महारक्तदान शिबिरांचे आयोजन करून 9 हजार 261 रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. 15 ऑगस्टच्या या शिबिरासह त्यांनी एकूण 18 शिबिरांच्या माध्यमातून एकूण 10 हजार 559 रक्त पिशव्यांचे संकलन करत 10 हजारांचा टप्पा पार केला आहे. या उपक्रमाची दखल स्टेट ब्लड ट्रान्सफ्यूजन महाराष्ट्र, मुंबई यांनी घेतली आहे.

 

रक्तदान शिबीरात 9 प्रमुख रक्तपेढ्यांनी सहभाग नोंदवला. यात अमरावती येथील इर्विन हॉस्पिटल, शासकीय रक्तपेढी, गोडे पाटील मेडिकल कॉलेज, संत गाडगेबाबा रक्तपेढी, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अकोला येथील लेडी हार्डिंग हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढी, जालना येथील जनकल्याण रक्तपेढी, यवतमाळ येथील एकनील रक्तपेढी यांनी सहभाग नोंदविला.

 

शिबीराला महापालिकेचे विरोधी पक्षनेता विलास इंगोले, नगरसेवक दीपक सम्राट, प्रदिप हिवसे, चंदूर खेडकर, संजय तिरथकर, यश खोडके, सुनील राणा यांनी भेट दिली. शिबीरात मेजन आनंद, मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी, अधीक्षक प्रमोद सोनोने, शशिकांत गर्जे, सीमा झावरे, नितीन देशमुख, अनिल भामोरे यांनी रक्तदान केले. यावेळी आनंद भामोरे, राजूभैय्या जैस्वाल, हरीश आलमचंदानी, इस्माइल लालूवाले, सायकलिंग असोशिएशनचे डॉ. कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. शिबीरासाठी सहकार्य करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.  प्रतिक्षा डांगे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. राजगुरे यांनी आभार मानले.

 

थॅलेसेमियाचे रुग्ण, आपत्कालीन शस्त्रक्रिया आणि अपघातातील रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने शिबीराचे आयोजन करण्यात आले. संघातर्फे अध्यक्ष नितीन देशमुख, उपाध्यक्ष अनिल भामोरे, राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक शशांक गर्जे यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages