अमरावती, दि. ३० : उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब-एरिया मुख्यालय यांच्या माजी सैनिक शाखेतर्फे माजी सैनिक संपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सीएसडी कॅन्टीनजवळील एनसीसी ग्रुप मुख्यालयात पार पडणार आहे.
कार्यक्रमात सर्व माजी सैनिक व त्यांच्या आश्रितांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारी, प्रश्न व अडचणींचे जागेवरच निवारण करण्यात येणार आहे. मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या समस्यांशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. यात डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, पीपीओ आणि इतर संबंधित कागदपत्रे यांचा समावेश आहे.
सर्व आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या आश्रितांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.