हरित ऊर्जेच्या दिशेने 'अमृत'चे मोठे पाऊल; 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 1, 2026

हरित ऊर्जेच्या दिशेने 'अमृत'चे मोठे पाऊल; 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन'

 




योजनेद्वारे जिल्ह्यातील युवकांना स्वयंरोजगाराची संधी

अमरावती, दि.१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): पर्यावरण संवर्धन, हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभर 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावती जिल्ह्यामध्ये विशेष जनजागृती व लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक, महिला आणि उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असल्यामुळे भविष्यात शहरांसह तालुका व ग्रामीण भागातही ईव्ही चार्जिंग स्टेशनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता निर्माण होणार आहे. या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठया  संधी उपलब्ध होणार असल्याने अमृतने आपल्या लक्षित गटातील युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट तसेच नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन भविष्यातील हरित ऊर्जा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारावा, यासाठी अमृत जिल्हा कार्यालयामार्फत गावपातळीपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा आणि फ्रँचायझी मॉडेल यासंदर्भात तज्ज्ञांकडून विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभही मिळणार असून, यामुळे नवोदित उद्योजकांना आर्थिक दिलासा मिळेल. इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि बारावीची गुणपत्रिका ही कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 'अमृत जिल्हा कार्यालय, आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडी रोड, टोपे नगर, अमरावती' येथे किंवा 9112227635/ 7249451152 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages