शिरजगाव कसबा दिनांक २८
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
शिरजगाव कसबा येथील 'पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था' या संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता, अपुऱ्या निधीचा धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला चांदूर बाजार न्यायालयाने दोषी ठरवून ही महत्त्वपूर्ण शिक्षा सुनावली आहे.
देऊरवाडा (ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) येथील रहिवासी मकसूद खा शब्बीर खा यांनी १० ऑक्टोबर २०१४ रोजी शिरजगाव कसबा येथील 'पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित' मधून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्ज घेतल्यानंतर त्यांनी ठरवून दिलेल्या मुदतीत आणि नियमितपणे कर्जाच्या हप्त्यांची फेड केली नाही. पतसंस्थेची कर्जाची रक्कम थकीत झाल्यामुळे, या थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी आरोपी मकसूद खा यांनी पतसंस्थेला एक धनादेश (चेक) लिहून दिला होता.
पतसंस्थेने आरोपीने दिलेला धनादेश वटवण्यासाठी बँकेत जमा केला. मात्र, आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे (अपर्याप्त निधी) तो धनादेश बँकेकडून अनादरीत (बाउन्स) करण्यात आला. धनादेश अनादर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, पतसंस्थेने कायदेशीर नोटीस बजावूनही आरोपीने थकीत रक्कम दिली नाही. अखेर पतसंस्थेने या प्रकरणी आरोपी मकसूद खा शब्बीर खा यांच्याविरुद्ध चांदूर बाजार न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.
हा खटला चांदूर बाजार न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (कोर्ट नंबर ३) माननीय न्यायाधीश एच. एस. सोनार यांच्या न्यायालयासमोर चालला. न्यायालयात दोन्ही बाजूंचे साक्ष-पुरावे तपासण्यात आले आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सविस्तरपणे ऐकून घेण्यात आला.
गुन्ह्याची गांभीर्यता आणि पुरावे लक्षात घेता, माननीय न्यायाधीश एच. एस. सोनार साहेबांनी आरोपी मकसूद खा याला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला ४ महिने कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच २,६५,००० रुपये (दोन लाख ६५ हजार) इतका दंड फटकावला. हा दंडाची रक्कम फिर्यादी पतसंस्थेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने आपल्या निकालात दिले आहेत.
या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. सचिन एस. यावले यांनी अतिशय प्रभावीपणे आणि बाजू मांडत कामकाज पाहिले.