अमरावती, दि . १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या महिला केंद्रित योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले आहे.
येथील महसूल भवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी बोलताना श्रीमती रहाटकर यांनी सर्व शासकीय विभागांना एका महिन्याच्या आत आपल्या कार्यालयांमध्ये 'पॉश' म्हणजेच लैंगिक छळ प्रतिबंधक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. या समित्या स्थापन करून त्याचा सविस्तर अहवाल संबंधित जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आढावा बैठकीला विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे, वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी तसेच वन विभागाच्या मुख्य वन संरक्षक जयोती बॅनर्जी, वनसंरक्षक अर्जुना के आर यांच्यासह सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व समित्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी येत्या चार महिन्यांचा एक सुनियोजित कार्यक्रम तयार करून राबविण्यात यावा. महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पीडित महिलांना तातडीने आणि अत्यंत संवेदनशीलतेने न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी अत्यंत सुरक्षित, भयमुक्त आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करणे ही सर्वच शासकीय यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या.
संकटकाळात सापडलेल्या किंवा पीडित महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर आणि मानसिक मदत देणाऱ्या 'वन स्टॉप सेंटर' या योजनेबाबत जनजागृती करण्यात यावी, तसेच तेथील सेवांची वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय, ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारात योग्य स्थान मिळावे आणि या वस्तू आपल्या जिल्ह्याची एक स्वतंत्र ओळख 'ब्रॅन्ड ' म्हणून पुढे याव्यात, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती रहाटकर यांनी यावेळी केले.