58 तक्रारींवर राष्ट्रीय महिला आयोगाची जनसुनावणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, July 12, 2026

58 तक्रारींवर राष्ट्रीय महिला आयोगाची जनसुनावणी






अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने दि.३ जुलै ला  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनसुनावणी घेण्यात आली. यात 58 तक्रारी विचारात घेण्यात आल्या. विशेष म्हणजे उपस्थित सर्व तक्रारदारांशी आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्तिश: भेट दिली आणि त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांना निर्देश दिले.

जनसुनावणीच्या वेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्यासह आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

जनसुनावणीसाठी आलेल्यांची नोंदणी करून त्यांना टोकन क्रमांक देण्यात आले. नियोजन भवनात दोन पॅनेल करून उपस्थित महिलांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर संवेदनशील प्रकरणी आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रहाटकर यांनी तक्रारदारांशी व्यक्तीश: संवाद साधला. जनसुनावणीत प्रामुख्याने पॉश, नातेसंबंधातील तडजोडीची प्रकरणे, घरगुती हिंसाचार आदी प्रकरणे समोर आली. काही प्रकरणी तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेऊन श्रीमती रहाटकर यांनी पोलिसांना तात्काळ गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांची प्रत सादर करण्यास सांगितले. तडजोडीच्या प्रकरणात काहींनी एकत्र राहण्याचे मान्य केले.

जनसुनावणीत आली प्रकरणे ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या प्रकरणांचा मागोवा घेतला जाणार आहे. यातून पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. गुन्हा नोंदविल्यानंतर चार्जशिट दाखल करण्यापर्यंत प्रकरणांचा पाठपुरावा केला जाणार आहे. आयोगाच्या आखत्यारीत येऊ शकणार नाही, अशा प्रकरणी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारी योग्य प्राधिकरणाकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या राज्यातील विविध भागात जनसुनावण्यामुळे महिलांसाठी असलेल्या यंत्रणांबाबत जनजागृती वाढण्यास मदत होत असल्याचे श्रीमती राहटकर यांनी सांगितले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages