पुराव्यावर आधारितनिर्णयप्रक्रियेसाठी अचूक आकडेवारी महत्त्वपूर्ण - विभागीय आयुक्तनयना गुंडे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 13, 2026

पुराव्यावर आधारितनिर्णयप्रक्रियेसाठी अचूक आकडेवारी महत्त्वपूर्ण - विभागीय आयुक्तनयना गुंडे

 






* राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 81 व्या फेरीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन

* प्रबोधिनीच्या परिसरात विभागीय आयुक्तांकडून वृक्षारोपण

 

अमरावती, दि. १३ : आजच्या काळात सुप्रशासन हे पूर्णपणे पुराव्यावर आधारित निर्णयप्रक्रियेवर अवलंबून आहे. कृषी, ग्रामीण विकास, वित्तीय समावेशन, आरोग्य, शिक्षण किंवा पायाभूत सुविधा अशा कोणत्याही क्षेत्रातील प्रभावी धोरणे ही केवळ अचूक आणि वेळेवर उपलब्ध होणाऱ्या आकडेवारीवरच आधारित असतात. विश्वासार्ह सांख्यिकीमुळेच शासनाला प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊन प्राधान्यक्रम निश्चित करणे, संसाधनांचे परिणामकारक नियोजन करणे आणि विकास योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन करणे शक्य होते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी आज येथे केले.

अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आयोजित राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 81 व्या फेरीअंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती गुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या 81 व्या फेरीमध्ये 'अखिल भारतीय कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षण' (AIDIS) आणि 'कृषी कुटुंबांच्या परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षण' (SAS) ही दोन अत्यंत महत्त्वाची सर्वेक्षणे राबविण्यात येत आहेत. यावेळी मंचावर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार, राष्ट्रीय सांख्यिंकी संस्था, नागपूरचे संचालक एल.एम. जडेजा, विशेष आयुक्त कृष्णा फिरके, अतिरिक्त आयुक्त दिनेश वाघ, अमोल खंडारे, प्रबोधिनीचे निबंधक श्यामकांत मस्के आदी उपस्थित होते.

दोन्ही सर्वेक्षणांचे महत्त्व अधोरेखित करताना विभागीय आयुक्त नयना गुंडे म्हणाल्या की, या सर्वेक्षणांमधून कुटुंबांचे उत्पन्न, ऋणस्थिती, गुंतवणूक तसेच कृषी कुटुंबांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. ही माहिती ग्रामीण भागाचा विकास अधिक सक्षम करण्यासाठी, कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणारी प्रभावी धोरणे तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे सर्वेक्षण जरी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत करण्यात येत असले, तरी याचा संबंध प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वच विभागांशी येतो.

प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्ह्याच्या कामगिरीचा आढावा घेणे, विकासातील तफावत दूर करणे आणि भविष्यातील कामांचे नियोजन करण्यासाठी आम्ही सांख्यिकी अहवालांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. त्यामुळे सांख्यिकी यंत्रणेचे कार्य केवळ अहवाल प्रकाशित करण्यापुरते मर्यादित नसून ते सुशासन अधिक प्रभावी बनविण्यास थेट हातभार लावते. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय नेहमीप्रमाणेच गुणवत्ता, अचूकता आणि व्यावसायिकतेची उच्च मानके कायम ठेवत हे राष्ट्रीय सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करेल, असा विश्वास विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी व्यक्त करुन प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

‘एआयडीआयएस’ व ‘एसआएस’ या सर्वेक्षणांचे यश हे प्रामुख्याने क्षेत्रीय स्तरावरील (Field Work) कामाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. प्रामाणिकपणे घेतलेली प्रत्येक मुलाखत आणि अचूकपणे नोंदविलेले प्रत्येक उत्तर हेच आपल्या अधिकृत सांख्यिकीची विश्वासार्हता वाढवणारे मुख्य घटक आहेत. त्यामुळे या तीन दिवसीय प्रशिक्षणाचा सर्व प्रशिक्षणार्थींनी पूर्ण लाभ घ्यावा, आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घ्यावे आणि सर्वेक्षणाचे काम अत्यंत लक्षपूर्वक, अभ्यासूवृत्तीने व समर्पित भावनेने पार पाडावे, असे आवाहन विशेष आयुक्त श्री. फिरके यांनी यावेळी केले.

श्री. जडेजा म्हणाले की, कर्ज आणि गुंतवणूक सर्वेक्षणातून (AIDIS) ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची वित्तीय स्थिती समजते. लोकांना बँकांकडून सहज कर्ज मिळते की ते अजूनही खाजगी सावकारांच्या पाशात अडकले आहेत, हे यातून स्पष्ट होते. यामुळे बँकिंग सेवांचा विस्तार करणे आणि गरजूंपर्यंत अधिकृत वित्तीय साहाय्य पोहोचवणे सरकारला सोपे जाते. तसेच शेतकरी कुटुंबाच्या परिस्थिती मुल्यांकन सर्वेक्षणातून (SIS) शेतकरी बांधवांच्या नेमक्या अडचणी काय आहेत याबाबत माहिती मिळते. (उदा. सिंचनाचा अभाव, संस्थात्मक कर्जाची अनुपलब्धता किंवा साठवणुकीची समस्या). त्यानुसार कृषी क्षेत्रासाठी विशेष पॅकेज किंवा अनुदानाच्या योजना, ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी तसेच सिंचन सुविधांचा करण्यासाठी या सर्वेक्षणाची आकडेवारी महत्वपूर्ण ठरते. क्षेत्र स्तरावर (Field Work) प्रामाणिकपणे घेतलेली प्रत्येक मुलाखत आणि नोंदवलेले प्रत्येक उत्तर हे देशाच्या विकासाचा नकाशा तयार करत असते. म्हणूनच, हे प्रशिक्षण केवळ एका सर्वेक्षणापुरते मर्यादित नसून 'राष्ट्र निर्मितीला मदत करणारे' आणि 'जनकल्याणाचा पाया रचणारे' एक अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे, असे श्री. जडेजा यांनी सांगितले.

या सर्वेक्षणांचे यश हे प्रामुख्याने क्षेत्रीय स्तरावरील कामाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. प्रामाणिकपणे घेतलेली प्रत्येक मुलाखत, अचूकपणे नोंदविलेले प्रत्येक उत्तर आणि काळजीपूर्वक भरलेले प्रत्येक अनुसूची हे आपल्या अधिकृत सांख्यिकीची विश्वासार्हता वाढविणारे घटक आहेत. त्यामुळे या प्रशिक्षणाचा प्रत्येक प्रशिक्षणार्थींनी पूर्ण लाभ घ्यावा, सर्व संकल्पना नीट समजून घ्याव्यात आणि सर्वेक्षणाचे काम लक्षपूर्वक अभ्यासपूर्वक, प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने पार पाडावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त डॉ. पडियार यांनी केले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि प्रशिक्षणार्थींचे आभार त्यांनी मानले.

या तीन दिवसीय प्रशिक्षण सत्राला राज्यातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित झाले आहे. याप्रसंगी विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांच्या हस्ते प्रबोधिनीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages