जिल्ह्यात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 2, 2026

जिल्ह्यात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा





नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 
17 जणांवर दंडात्मक कारवाई

अमरावती, दि. २(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीद्वारे 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा दिवस ‘आकर्षणाचा मुखवटा उतरवूया: तंबाखू आणि निकोटीनच्या व्यसनाचा प्रतिकार करूया’ या संकल्पनेवर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, बस स्थानक व रेल्वे स्टेशन येथे पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा-2003) अंतर्गत दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 7 व्यक्तींकडून 1 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच नागपुरी गेट पोलिसांच्या मदतीने पठाणपुरा व चांदणी चौक परिसरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांवर धाड टाकून, 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणाऱ्या आणि शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात विक्री करणाऱ्या 10 विक्रेत्यांवर कारवाई करत 2 हजार  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 17 व्यक्तींकडून 3 हजार 300 रुपयांची दंडवसुली झाली.

जनजागृतीचा भाग म्हणून रुग्णालयांमध्ये रुग्ण, नातेवाईक, आशा सेविका आणि बचतगटांच्या महिलांसाठी विशेष गटचर्चा व समुपदेशन सत्रे घेण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छता वाहनांवरून आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती संदेश प्रसारित करण्यात आले. औद्योगिक व परिचर्या संस्थेतील विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली, तर रुग्णालयात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. आकाशवाणी अमरावतीवरून जिल्हा सल्लागार डॉ. मंगेश गुजर यांचे मार्गदर्शन प्रसारित झाले. आज, दि. 1 जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ देऊन  ‘व्यसनाला नकार, आरोग्याचा स्वीकार’ या आवाहनासह मोहिमेचा समारोप करण्यात आला.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages