१ जुलैपासून पासपोर्टसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

केंद्र सरकारकडून शुल्कवाढ



दि.३० नवी दिल्ली:
केंद्रातील सरकारने पासपोर्ट आणि त्याशी संबंधित विविध सेवांच्या शुल्कात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 'पासपोर्ट नियम, १९८०' मध्ये सुधारणा करून ही नवीन शुल्क रचना १ जुलै २०२६ पासून देशभरात लागू होणार आहे.ही नवीन शुल्क रचना १ जुलै २०२६ पासून लागू होणार असून, नवीन पासपोर्ट काढणाऱ्या तसेच पासपोर्टचे नूतनीकरण (रिन्यूअल) करणाऱ्या नागरिकांना आता वाढीव शुल्क द्यावे लागणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातील सुधारित शुल्क रचना जाहीर केली आहे.
कोणत्या सेवांवर होणार परिणाम?
सुधारित शुल्काचा फटका नवीन पासपोर्ट काढणे, पासपोर्टचे नूतनीकरण किंवा पुनर्जारीकरण करणे, हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट बदलून देणे, तसेच पासपोर्टसाठी लागणारे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification Certificate) यांसारख्या सेवांना बसणार आहे.
१ जुलैपासून लागू होणारे महत्त्वाचे नवे दर:
३६ पानांचा सामान्य पासपोर्ट (१० वर्षे वैधता): ₹ १,५००
६० पानांचा सामान्य पासपोर्ट: ₹ २,०००
१८ वर्षांखालील अल्पवयीनांसाठी पासपोर्ट: ₹ १,०००
हरवलेला/खराब झालेला ३६ पानांचा पासपोर्ट: ₹ ३,०००
हरवलेला/खराब झालेला ६० पानांचा पासपोर्ट: ₹ ३,५००
पोलीस पडताळणी प्रमाणपत्र: ₹ ५००
तातडीच्या सेवेसाठी (तत्काळ) अतिरिक्त शुल्क: ₹ २,०००
या शुल्कवाढीत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. ताज्या पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या ८ वर्षांपर्यंतच्या मुलांना आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शुल्कात १० टक्के सवलत मिळत राहील. मात्र, ही सवलत 'पुनर्जारीकरण' (Re-issue) अर्जांसाठी लागू असणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी नागरिकांना आवाहन
अर्जदारांनी शुल्क भरण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत दर तपासून घ्यावेत. पासपोर्ट सेवा केंद्राच्या अधिकृत संकेतस्थळावरील शुल्क गणकाच्या (Fee Calculator) मदतीने संबंधित सेवेसाठी लागणाऱ्या अचूक शुल्काची माहिती मिळवता येऊ शकते.

Post a Comment

0 Comments