जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा तिवसा तालुक्यात 'गावमुक्काम' - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, June 14, 2026

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा तिवसा तालुक्यात 'गावमुक्काम'



 नागरिकांशी साधला थेट संवाद

अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकताच तिवसा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मौजे मोझरी येथे 'गावभेट व गावमुक्काम' केला, ज्यामुळे 'प्रशासन आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याचे पाहायला मिळाले. 

              दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, ११ जून रोजी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी मौजे शिवणगाव येथील कृषी विभागांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील प्रकल्पांना भेटी दिल्या. यामध्ये निलेश कुरवाडे यांच्या 'अर्क आईस्क्रीम युनिट ' आणि स्वाती डोळस यांच्या 'हळद पावडर प्रकल्पा'ची पाहणी करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच शिवणगाव येथील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            यानंतर त्यांनी तिवसा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय धान्य गोदामाची पाहणी करून डॉ. पंजाबराव देशमुख खरेदी-विक्री संघाच्या ज्वारी खरेदीचा आढावा घेतला. 

जिल्हाधिकाऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेऊन शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींवर गतिमान कारवाई करण्याचे निर्देश दिले. गुरुदेवनगर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सामूहिक प्रार्थनेला उपस्थित राहिले. तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त जनार्धन बोथे गुरुजी यांचा शाल व श्रीफळ देऊन प्रशासनातर्फे सत्कार केला. 

सायंकाळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी मोझरी येथील झेंडा चौकात ग्रामस्थांशी व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत अनेक प्रश्नांवर जागेवरच निर्णय घेतले व रात्री मोझरी गावातच मुक्काम केला. 

  दुसऱ्या दिवशी, सकाळी त्यांनी मोझरी विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध इमारतींच्या बांधकामांची पाहणी केली. यानंतर तिवसा नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोला भेट देऊन मुख्याधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथील स्वच्छता, कर्मचारी उपलब्धता व आरोग्य सुविधांची तपासणी करून त्यांनी आवश्यक सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नूतनीकरण करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाची पाहणी करून त्यांनी दप्तराच्या कामकाजाचाही आढावा घेतला. 

            यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार मयूर कळसे, गट विकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्यासह सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशील आणि लोकाभिमुख दौऱ्यामुळे तिवसा तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती अत्यंत सकारात्मक व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages