31 मे तंबाखू विरोधी दिनानिमित्त पिचकार्‍यांनी सजले कोपरे...! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 1, 2026

31 मे तंबाखू विरोधी दिनानिमित्त पिचकार्‍यांनी सजले कोपरे...!

दि. १ जून :-




अनेक व्यापारी संकुल, सरकारी कार्यालये या सारख्या इमारतींमधे आपण जिन्याच्या कोपर्‍यात, लिफ्ट मधे कोपर्‍यात अशा ठिकाणी लोक थुंकलेले दिसतात.अगदी सुसंस्कृत गृहसंकुलात देखील ही दृष्य कधी कधी दिसतात. पानटपरीच्या आसपास तर विहंगम दृश्य असते. ’रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून’ हे कवीला अशी दृष्ये पाहूनच सुचले असावे. पान गुटका तंबाखू वगैरे खाउन किंवा न खाताही थुंकणार्‍या लोकांचे प्रमाण खूप मोठे आहे.

तंबाखू खाणे प्राणघातकच आहे, जगभरात स्मोकिंग ही गोष्ट अगदीच सामान्य झाली आहे. तंबाखूचा वापर धूम्रपान 'हुक्का' सिगार, बिडी, गुटखा, सुपारी आणि जर्दा इत्यादी धूररहित तंबाखूजन्य पदार्थांच्या रूपात केला जातो. धूम्रपान हे कर्करोग आणि फुफ्फुसांचे आजार जसे की क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, हार्ट स्ट्रोक, डायबिटीज, स्त्रियांमध्ये वांझपणा, कमी वजन, वेळेआधी प्रसूती, जन्मदोष आणि इरेक्टाइल डिसफंक्शन याचे मुख्य कारण आहे.
चार चौघं एकत्र गप्पा गोष्टींमध्ये रंगले असतांना अथवा प्रवासातही अनोळखी व्यक्ती थोडा  तंबाखू काढा मग, आपला घोटा असे शब्द ऐकण्यात येतात. हे शब्द प्रौढ व्यक्तिंच्याच नव्हे तर युवा पिढींच्याही तोंडून बाहेर पडत आपल्या कानावर नकळत आदळतात.एका हाताची तर्जनी दुसऱ्या तळ हाताच्या मध्यभागी रगडून इशाऱ्याने देखील तंबाखू मागणारे सुटाबुटातील तंबाखूप्रेमी बघावयास मिळतात.कितीही गर्भ श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याला तंबाखू खाण्याचं व्यसन असेल तर तो जराही लाज न बाळगता  समोरच्याला तंबाखूची भीक मागीतल्या शिवाय राहात नाही हे वास्तव आहे.घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
व्यसन कोणतेही असो ते एकदाचे जडले की मग व्यसन करणाऱ्यांना पद, प्रतिष्ठा, सन्मान,  कुटुंब, आजार याचे कोणतेही भान राहात नाही त्यांच्यासाठी व्यसनचं धर्म व्यसनचं कर्म आणि व्यसनचं देव बनतं सुरवातील याचा फँशन अथवा अनुभव म्हणून सुरवातं होते नंतर त्याच्या अधीन होतात.
मनात गैरसमज आहे, की ताण कमी व्हावा यासाठी दारू, सिगारेट, तंबाखू यांची गरज असते.ताण आहे म्हणून काहीजण व्यसन करतात, पण हे  समस्येपासून दूर पळणं आहे. आणि दूर पळून जाऊन कुठलीही समस्या सुटत नाही. त्याला सामोरे जावून मार्ग काढावा लागतो. व्यसनाला सुरुवात होताना या गोष्टी कधीचं लक्षात येत नाहीत.
पूर्वी चित्रपटात खलनायक दारू सिगारेट पिताना दाखवायचे हल्ली नायक नायिकाही दारू पिताना दाखवतात.चित्रपटांमधून जणू असा संदेश देतात, की आनंद झाला तर  व्यसन करा आणि दुःख झालं तरीही व्यसन करा.चित्रपटात बघून करण्याच्या अशा अनेक गोष्टींचा प्रभाव दर्शकांवर पडताना दिसतो.
केंद्र तसेच राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतात.जनजागृतीतून व्यसनांचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी,मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरातींवर बंदी, शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून व्यसन करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने दिले आहेत.तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
तंबाखू सेवनाने भारतात जवळपास १० लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात   पुरुष व महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात.देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.तथ्य आधार भारतात तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा कँसर (कर्करोग) असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या सर्वांत मोठी आहे. भारतात, ५६.४ % स्त्रियांना आणि ४४.९ % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. ९०% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्‍सर आणि इतर कँसर होण्‍याचे कारण धूम्रपान आहे.
पुरुषार्थ म्हणून आपल्या भावना दाबून ठेवण्याची प्रवृत्ती पुरुषांमध्ये आधीपासून आहे. पुरुषांनी रडायचं नसतं, हे लहानपणापासून त्यांच्या मनावर ठासून असतं. पुरुषासारखा पुरुष आणि रडतोस कसला? असं सहज बोलल्या जातं, त्यामुळं पुरुष मंडळी मनात ताण दाबण्यासाठी,ताण सहन करण्यासाठी दारू, सिगारेट चा वापर करत त्यातून व्यसनाधीन होतातं.अलीकडच्या काळात महिलांही व्यसन करतांना दिसतात. रडणं आणि बोलून मन मोकळं करणं होत नसल्याने बायकांमध्ये ही अलीकडच्या काळात व्यसनाधीनता वाढण्याचं मुख्य कारण आहे, त्यामुळं व्यसनमुक्तीसाठी पहिल्यांदा रडणं,मन मोकळं करणं,जवळच्या व्यक्तिशी संवाद साधणं हे कमीपणाचं लक्षण नाही.तुमची समस्या व्यक्त करा. रडायला येणं हे कमकुवतपणाचं नाही तर मनाला शांत करण्याच्या मानसिकतेचं लक्षण आहे.मन शांत असेल तर ताण येणार नाही आणि कोणत्याही अडचणीत अचूक मार्ग काढता येईल मग व्यसन असो अथवा कोणतेही वाईट विचार डोक्यात शिरणार नाही. आपल्याच जीवनाचा व्यसनाधीनतेने स्वाहा होणार नाही.!!.

सौ.कंचन मुरके,अमरावती
अध्यक्ष 
 महिला मंच 
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (महाराष्ट्र प्रदेश)
--------------------------------------
--------------------------------------

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages