*कृषि विभागाचे आवाहन
अमरावती, दि.१२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान' तसेच 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान' अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट आणि कंपन्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेत सहभागासाठी पीक प्रात्यक्षिकात अन्नधान्य व वाणिज्यिक पिके, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषि क्षेत्रातील सहकारी संस्था, शेतकरी गटाची नोंदणी 31 मार्च 2024 पूर्वीची असावी. यात महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्यांना 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर निवडले जाणार आहे. एका गावातून एकाच शेतकरी गटाची निवड होईल. गटातील जास्तीत जास्त 25 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मात्र एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येईल.
योजनेच्या लाभासाठी सर्व शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानात बियाणे मिनीकीट वितरणामध्ये प्रमाणित बियाणे संच (मिनीकीट) वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारले जात आहेत. यातही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
इच्छुक लाभार्थ्यांनी राज्य शासनाचे पोर्टल mahadbt.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज सादर करावेत. पीक प्रात्यक्षिकांसाठी 10 एप्रिल 2026 पासून पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.