ज्ञानभारतम् राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, May 11, 2026

ज्ञानभारतम् राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ




जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन

अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्क) : भारताचा समृद्ध आणि मौल्यवान हस्तलिखित वारसा जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने ज्ञानभारतम् या महत्त्वाकांक्षी मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेत देशभरातून एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारताला हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभलेला आहे. ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आहेत. हे सर्व ज्ञानभंडार एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार केला जाणार आहे. यात हस्तलिखितांचा 'राष्ट्रीय डिजिटल संग्रह' तयार करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत हस्तलिखितांची मालकी ही मूळ संस्था, ग्रंथालय किंवा खासगी संग्राहक यांच्याकडेच राहणार आहे. मात्र, स्वखुशीने ही हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करायची असल्यास शासन स्विकारणार आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात विविध सांस्कृतिक संस्था व विद्यापीठांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे. प्रकल्पासाठी राज्याची नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालयाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणासाठी ग्यान भारतम् हे विशेष मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे हस्तलिखितांचे मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर देखील जिल्हा नोडल अधिकारी आणि जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून विविध मंदिरे, मठ, शैक्षणिक संस्था व खासगी संग्राहकांना या मोहिमेत जोडून घेतले जात आहे. या मोहिमेत विद्यार्थी, संशोधक, पारंपरिक पंडित, एनसीसी आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

नागरिकांकडे अथवा संस्था, मंदिरे, ग्रंथालये किंवा खासगी संग्रहात जुनी हस्तलिखिते उपलब्ध असल्यास, त्याची माहिती ग्यान भारतम् या मोबाईल अॅपवर अपलोड करावीत. या अमूल्य ज्ञानवारशाचे जतन करण्याच्या कार्यात नागरिक, संस्था आणि संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages